माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापनाचा शेतकऱ्यांना सल्ला; कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन
जामखेड: जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी माती परीक्षणानुसार खतांचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, हाळगावच्या विद्यार्थ्यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या RAWE व AIA २०२६-२७ कार्यक्रमांतर्गत जवळा येथे संतुलित खत वापर जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते.
अभियानादरम्यान शेतकऱ्यांना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, माती परीक्षणाचे महत्त्व तसेच सेंद्रिय, जैविक, हिरवळीची व रासायनिक खतांचा संतुलित वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. जमिनीची सुपीकता वाढविणे, उत्पादन खर्चात बचत करणे, जमिनीचे आरोग्य सुधारणे आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे यासाठी संतुलित खत व्यवस्थापन आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गांडूळखत, कंपोस्ट खत, शेणखत आणि जैविक खतांचा वापर वाढविण्याबरोबरच फुले सुपर बायोमिक्स व फुले द्रवरूप ॲसिटोबॅक्टर जिवाणूंचा शिफारशीनुसार वापर करण्याचे महत्त्वही शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. तसेच माती परीक्षण करून त्यानुसार खत व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत सक्रिय सहभाग नोंदविला. संतुलित खत वापरामुळे जमिनीचे आरोग्य टिकून राहून उत्पादनात वाढ होते आणि शेती अधिक फायदेशीर बनते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. गोकुळ वामन, केंद्रप्रमुख प्रा. पोपट पवार, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी डॉ. उत्कर्षा अमोलिक व डॉ. दिपक वाळुंजकर यांचे मार्गदर्शन लाभले. कृषिकन्या श्वेता पाटील, सुरेखा पोफळे, मृणालिनी सरोते, प्रतिक्षा दळवी, विशाखा सोनवणे व गायत्री जाधव यांनी अभियानाच्या आयोजनात सहभाग घेतला.










