जिल्हा बँकेच्या ठरावांवरून जामखेडमध्ये राजकारण तापले

Spread the love

सेवा सोसायट्यांचे ठराव नियमबाह्य पद्धतीने घेतल्याचा शरद कार्ले यांचा आरोप; चौकशी करून संबंधित ठराव रद्द करण्याची मागणी

जामखेड : अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक (अहिल्यानगर) व्यवस्थापक समितीच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच जामखेड तालुक्यात ठरावांवरून राजकारण तापले आहे. सेवा सहकारी संस्थांचे ठराव घेताना सहकार विभागाने निर्धारित केलेली प्रक्रिया डावलून काही ठिकाणी परस्पर ठराव करण्यात आल्याचा आरोप जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठराव रद्द करण्यात यावेत तसेच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सहकार विभागाकडे केली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव १७ जून ते १६ जुलै २०२६ या कालावधीत मागविण्यात येत आहेत. जामखेड तालुक्यात अशा ४८ सेवा सहकारी संस्था मतदानासाठी पात्र आहेत. या ठरावांच्या माध्यमातून निवडणुकीतील प्रतिनिधी निश्चित होणार असल्याने ठराव प्रक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

शरद कार्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वाकी, मोहा, सावरगाव आणि कोल्हेवाडी या सेवा सोसायट्यांचे ठराव मागील काही दिवसांत नियमबाह्य पद्धतीने घेण्यात आल्याची आरोप शरद कार्ले यांनी केला आहे. नियमानुसार बैठकीचा अजेंडा काढल्यानंतर संचालक मंडळाला किमान सात दिवसांची मुदत देणे आवश्यक असते. त्यानंतर अधिकृत बैठक घेऊन ठराव मंजूर केला जातो. मात्र संबंधित सोसायट्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण न करता परस्पर ठराव करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या संदर्भात कार्ले यांनी सहकार विभागाचे उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित प्रकरणाची चौकशी करून नियमबाह्य ठराव रद्द करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. तसेच सेवा सोसायट्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने कोणाच्याही दबावाखाली न येता आपल्या कार्यालयात अथवा नियमानुसार परवानगी घेऊनच ठराव प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत २० जानेवारी २०२६ रोजी संपुष्टात आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ तसेच सुधारित नियम २०१७ नुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठराव प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने होणे आवश्यक असल्याचे कार्ले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जामखेड तालुक्यातील १४ सेवा सोसायट्यांचा कारभार सध्या जामखेड येथील खरेदी-विक्री संघाच्या जागेतून सुरू असल्याचे सांगत, त्या संस्थांचे ठराव आणि इतर प्रशासकीय कामकाज त्यांच्या मूळ कार्यक्षेत्रातच व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकरी व सहकारी संस्थांसाठी महत्त्वाची वित्तीय संस्था मानली जाते. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर शेतकरी हिताचे प्रतिनिधी निवडून जाण्यासाठी निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक असणे गरजेचे असल्याचे कार्ले यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकरी व सहकारी संस्थांसाठी महत्त्वाची वित्तीय संस्था मानली जाते. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर शेतकरी हिताचे प्रतिनिधी निवडून जाण्यासाठी निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक असणे गरजेचे असल्याचे कार्ले यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

error: