जामखेडमध्ये एलसीबीची मोठी कारवाई: दीड लाखांचा अवैध गुटखा व तंबाखू जप्त; दोघांवर गुन्हे दाखल

Spread the love

जामखेड (प्रतिनिधी): अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जिल्ह्यात अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीविरुद्ध ६ व ७ ऑक्टोबर रोजी विशेष धडक मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत जामखेड शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण १,४१,५१६ रुपये किमतीचा अवैध गुटखा व तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

जामखेड परिसरातील कारवाईचा सविस्तर तपशील:

१) भवरवाडी येथील कारवाई: भवरवाडी (ता. जामखेड) येथे टाकलेल्या छाप्यात २८,३४० रुपये किमतीचा अवैध गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी अर्जुन गहिनीनाथ सोनटक्के (रा. भवरवाडी, ता. जामखेड) याच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (दाखल गुन्हा: जामखेड पो.स्टे. गु.र.नं. ६८३/२०२६; BNS कलम १२३, २२३, २७४, २७५)

२) पोकळेवस्ती येथील कारवाई: पोकळेवस्ती (जामखेड) परिसरातील दुसऱ्या छाप्यात १,१३,१७६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी श्वेत शिवाजी वीर (रा. पोकळेवस्ती, जामखेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान आरोपी आशुतोष शामराव रहाणे (रा. शिर्डी) आणि किरण बोराडे (रा. पाथरूड, ता. भूम, जि. धाराशिव) हे दोघे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (दाखल गुन्हा: जामखेड पो.स्टे. गु.र.नं. ६८४/२०२६; BNS कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५))

अवैध विक्रेत्यांना इशारा

जामखेड तालुका व शहरात अशाप्रकारे अवैध गुटखा आणि तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर यापुढेही स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांची कडक नजर राहणार असून, अशा बेकायदेशीर धंद्यांवर तीव्र कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Leave a Comment