जामखेड : आगामी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा जपून पार पाडण्यासाठी जामखेड पोलीस प्रशासनाच्या वतीने जोरदार पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. शनिवारी जामखेड पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. गणेश मंडळांनी यंदाचा उत्सव पारंपरिक वाद्यांच्या तालावरच साजरा करावा, असे कडक निर्देश पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिले आहेत.
शनिवारी सायंकाळी जामखेड पोलिस ठाण्यामध्ये पार पडलेल्या या बैठकीस शांतता समितीचे सदस्य, शहर व परिसरातील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच बेंजो आणि डीजे मालक व चालकांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्यात गणेशोत्सव काळात अतिउच्च आवाजाच्या ध्वनिवर्धकांवर आणि डॉल्बी सिस्टीमवर प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करत विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर पूर्णपणे टाळावा, असे पोलिसांनी बजावले. डीजेच्या गोंधळाऐवजी ढोल-ताशा, झांज आणि इतर पारंपरिक वाद्यांचा वापर करून संस्कृती व उत्सवाचा आनंद जपावा, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
गणेश मंडळांमार्फत व्यसनमुक्तीचा संदेशकेवळ उत्सव
साजरा न करता सामाजिक दायित्व जपण्याच्या उद्देशाने जामखेड पोलिसांनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. बैठकीत उपस्थित गणेश मंडळांना ‘अमली पदार्थविरोधी’ जनजागृतीचे डिजिटल फलक वितरित करण्यात आले. उत्सवाच्या १० दिवसांत हे फलक मंडपात लावून तरुण पिढीला व्यसनमुक्तीचा संदेश द्यावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

उत्सव काळात शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे यंदा जामखेडमध्ये कानठळ्या बसवणाऱ्या डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा गजर, सामाजिक भान आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे.









