विद्यार्थ्यांनी सुरक्षित वीज वापराचे ‘ब्रँड ॲम्बेसडर’ बनावे : दीपक ताटे

Spread the love

अभियंता दिनानिमित्त जवळा येथे महावितरणतर्फे विद्युत जनजागृती; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

जामखेड: मोबाईल, संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात विजेचा वापर प्रचंड वाढला आहे. वीज ही आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाली असली, तरी तिच्या वापरातील किरकोळ निष्काळजीपणाही क्षणात जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता सुरक्षित वीज वापर आणि ऊर्जा बचतीचा संदेश कुटुंब व समाजात पसरवून विजेचे खरखुरे ‘ब्रँड ॲम्बेसडर’ बनावे, असे उद्गार महावितरणचे सहाय्यक अभियंता दीपक ताटे यांनी काढले.

अभियंता दिनाचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, जवळा (ता.जामखेड) येथे महावितरण शाखा कार्यालय नान्नज आणि उपविभाग जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्युत जनजागृती व विद्यार्थी हितगुज’ कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ताटे बोलत होते. अभियंता हा केवळ तांत्रिक घटक नसून समाजघडणीतील मुख्य आधारस्तंभ असतो, असे सांगत त्यांनी लहान वयापासूनच ऊर्जा संवर्धनाची सवय अंगीकारण्याचे महत्त्व पटवून दिले.

संवाद साधताना ताटे यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील विद्युत सुरक्षेचे बारकावे प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले. ओल्या हाताने स्विचला स्पर्श न करणे, घरातील वीज यंत्रणेत योग्य अर्थिंग असणे, रस्त्यावरील तुटलेल्या किंवा लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांपासून दूर राहून तात्काळ प्रशासनाला कळवणे आणि उपकरणांमध्ये बिघाड झाल्यास स्वतः दुरुस्ती न करता तज्ज्ञांची मदत घेणे याविषयी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच ‘ऊर्जा बचत म्हणजेच ऊर्जा निर्मिती’ या सूत्राचा वापर करून गरज नसताना पंखे व दिवे बंद ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास महावितरण नान्नज शाखा कार्यालयाचे मुख्य तंत्रज्ञ शिवाजी गोरे, वरिष्ठ तंत्रज्ञ विशाल शिंदे, संतोष होळकर, अरुण निकम, ज्योतीराम चव्हाण, अक्षय काढणे यांच्यासह छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब जोरे तसेच सर्वच शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौरऊर्जेकडे वळण्याचे आवाहन

कार्यक्रमादरम्यान जवळा येथील वरिष्ठ तंत्रज्ञ विशाल शिंदे यांनी महावितरणच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ आणि ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र – निवासी रूफटॉप सौर योजना’ यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. घरांच्या छतावर सौर प्रकल्प उभारल्याने विजेचे बिल कसे शून्य होऊ शकते, पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कसे कमी होते आणि या योजनांसाठी शासन कसे भरघोस अनुदान देते, याविषयी शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या योजनांची माहिती आपल्या पालकांपर्यंत पोहोचवून सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Leave a Comment