कर्जबाजारीपणातून पोलिसांनाच बनवले ‘उलू’; सीसीटीव्ही आणि खाकीच्या खाक्यासमोर आरोपीची कबुली
जामखेड: डोळ्यात मिरची पूड फेकून तब्बल १० लाख ५० हजार रुपये आणि मोबाईल लुटल्याचा बनाव रचणाऱ्या भामट्याचा खर्डा पोलिसांनी काही तासांतच पर्दाफाश केला आहे. लोकांचे देणे टाळण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा थरारक बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
मंगळवारी (८ सप्टेंबर) दुपारी १२.०७ वाजता डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर एक कॉल आला. जामखेड-खर्डा महामार्गावरील सतेवाडी फाट्याजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी डोळ्यात मिरची पूड टाकून १० लाख ५० हजार रुपयांची बॅग आणि मोबाईल लुटल्याची माहिती कॉल करणाऱ्याने दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सीसीटीव्हीने उघड केली पोलखोल
तक्रारदार बालाजी अर्जुन लांडगे (वय ३९, रा. सुर्वेगल्ली, खर्डा) याने पुण्याहून येत असताना विनाक्रमांकाच्या स्प्लेंडरवरून आलेल्या भामट्यांनी ही लूट केल्याचा दावा केला होता. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी जामखेड रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, लांडगे याने सांगितल्याप्रमाणे कोणतीही संशयित गाडी त्या मार्गावरून गेल्याचे दिसले नाही.
देणेकऱ्यांपासून वाचण्यासाठी बनाव
संशय बळावल्याने पोलिसांनी बालाजी लांडगे याची कसून चौकशी केली. पोलिसांच्या खाकी खाक्यासमोर अखेर त्याने गुन्हा मान्य केला. खर्ड्यातील काही लोकांचे पैसे देणे बाकी होते, ते देणे टाळण्यासाठीच हा लुटीचा बनाव रचल्याची कबुली त्याने दिली.
डायल ११२ चा गैरवापर भोवला; गुन्हा दाखल
खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी बालाजी लांडगे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २१२ नुसार खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, उपनिरीक्षक अशोक खेडकर, संभाजी शेंडे, शशी म्हस्के, बाळू खाडे, राहुल खेडकर आणि प्रवीण थोरात यांच्या पथकाने केली.
पोलीस प्रशासनाचा इशारा
दरम्यान, ‘डायल ११२’ या आपत्कालीन सेवेचा गैरवापर करू नये. खोटी माहिती देणे किंवा विनाकारण कॉल करून पोलिसांची दिशाभूल केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांनी दिला आहे.









