जामखेड : फक्राबाद येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी शरद मारुती ऊबाळे, तर उपाध्यक्षपदी सीमा महेंद्र जायभाय यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
समितीच्या सदस्यपदी सौ. अश्विनी परशराम राऊत, मोहनिराज किसन आढाव, दत्तात्रय यादव जगताप, भाऊसाहेब आनंदराव राऊत, अमीर इब्राहिम शेख, संतोष रावसाहेब आमटे, सौ. नयन महेश गणगे, सौ. सुषमा रविंद्र मोहळकर, सौ. आरती गोवर्धन बांडराव, सौ. पल्लवी मारुती शिंदे आणि सौ. स्वाती अमोल देशपांडे यांची निवड झाली. संतोष हरिभाऊ राऊत यांची शिक्षणतज्ज्ञ म्हणून निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित समितीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण जायभाय यांनी अभिनंदन केले. शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समितीने प्रभावीपणे कार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नवनिर्वाचित अध्यक्ष शरद ऊबाळे यांनी शाळा ही केवळ चार भिंतींची इमारत नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याची पायाभरणी करणारे संस्कारमंदिर असल्याचे सांगितले. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी समितीच्या माध्यमातून भरीव योगदान देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पोलीस पाटील योगीनाथ जायभाय यांनी पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास शाळेला आदर्श शाळेचा दर्जा मिळवून देता येईल, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शाळेच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नवनिर्वाचित समितीच्या माध्यमातून शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे. शाळेच्या गरजा ओळखून विकासकामांना चालना देण्यासाठी पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कार्यक्रमास बहुसंख्य पालक उपस्थित होते. राजेंद्र हजारे सर यांनी सूत्रसंचालन केले, तर मुख्याध्यापक किरण फापाळे यांनी आभार मानले.








