खर्डा पोलिसांचा गुटखा तस्करांना दणका, ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

नाकाबंदीला न जुमानता पळणाऱ्या आयशरचा थरारक पाठलाग; तिघे ताब्यात

जामखेड : धाराशिवकडून बीडकडे शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य सुगंधी सुपारी घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोवर खर्डा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. नाकाबंदीच्या वेळी थांबण्याचा इशारा करूनही चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळ काढला. पोलिसांनी थरारक पाठलाग करून आयशर ताब्यात घेतला. झडतीमध्ये ४१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी सुपारीचा साठा आढळून आला. वाहनासह एकूण ५१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी दिले आहेत. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे आणि कर्जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलिसांनी ही कारवाई केली.

दि. २४ ऑगस्ट रोजी खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत व पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धाराशिवकडून एक आयशर टेम्पो शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गाने बीडकडे जाणार असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आहेत.

माहिती मिळताच पोलिसांनी खर्डा शहर हद्दीत नाकाबंदी केली. काही वेळातच संशयित आयशर टेम्पो पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला; मात्र चालकाने वाहन न थांबवता वेग वाढवून बीडच्या दिशेने पळ काढला.

आयशर चालकाने पळ काढताच पोलिसांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला. काही अंतर पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी आयशर टेम्पो ताब्यात घेतला. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य सुगंधी सुपारी आढळून आली.

पोलिसांनी ४१ लाख ४१ हजार ४८ रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी सुपारीचा साठा जप्त केला. तसेच अंदाजे १० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो ताब्यात घेतला. त्यामुळे या कारवाईत एकूण ५१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत म्हस्के यांच्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेला गुटखा कोठून आणण्यात आला, तो नेमका कुठे पोहोचविण्यात येणार होता तसेच या तस्करीच्या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर, पोलीस हवालदार संभाजी शेंडे, गोकुळ इंगवले, शशिकांत म्हस्के, रावसाहेब नागरगोजे, वेजिनाथ मिसाळ, बाळू खाडे, आनंद धनवडे, विष्णू आवारे, अशोक बडे, राहुल खेडकर तसेच होमगार्ड तान्हाजी जायभाय, महादेव कदम आणि राहुल भिसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Comment