‘बॉम्ब टाकून दवाखाना उडवून देईन’; नान्नज आरोग्य केंद्रात डॉक्टरांना धमकी

Spread the love

उपचारावरून डॉक्टरांशी हुज्जत; वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

जामखेड : ‘खोटा रिपोर्ट का देता?’ असा सवाल करत नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालणाऱ्या व्यक्तीने चक्क ‘बॉम्ब टाकून दवाखाना उडवून टाकीन, तुम्हाला जीव मारून टाकीन’, अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी (दि. २१) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि रुग्णांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी स्मिता सुरेश भोरे यांच्या फिर्यादीवरून कृष्णा प्रकाशसिंग राजपुत (रा. नान्नज, ता. जामखेड) याच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडीमध्ये रुग्णांवर उपचार सुरू होते. अश्विनी परसराम झगडे या ओपीडी जी.एन.एम. परिचारिका रुग्णांना सलाईन लावत होत्या. त्यावेळी कृष्णा राजपुत आरोग्य केंद्रात आले.

‘खोटा रिपोर्ट का देता?’ असे म्हणत आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. ते मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली यामुळे ओपीडीतील वातावरण बिघडले. यावेळी राजपुत मोठमोठ्याने शिवीगाळ करीत असल्याने ओपीडीतील वातावरण तणावपूर्ण झाले.

परिस्थिती पाहून वैद्यकीय अधिकारी स्मिता भोरे यांनी ओपीडीमधून बाहेर येत राजपुत यांना, ‘दादा, येथे इतर रुग्ण आहेत. त्यांना त्रास होत आहे. तुम्ही बाहेर थांबा,’ असे सांगितले. मात्र, हे सांगितल्याचा राग आल्याने राजपुत यांनी डॉक्टर भोरे आणि परिचारिका अश्विनी झगडे यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर संबंधिताने डॉक्टर व परिचारिकेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच ‘बॉम्ब टाकून दवाखाना उडवून टाकीन’, असे म्हणत आरडाओरड केली. एवढ्यावर न थांबता तो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून आला आणि दमदाटी केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

हा संपूर्ण प्रकार प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडीमध्ये उपस्थित रुग्णांसमोर घडल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप वैद्यकीय अधिकारी भोरे यांनी फिर्यादीत केला आहे.

घटनेच्या वेळी वैद्यकीय अधिकारी स्मिता भोरे यांच्यासह अश्विनी परसराम झगडे (ओपीडी जी.एन.एम.), लक्ष्मण रंगनाथ ठोसर (एच.ए.), अविनाश अर्जुन तोरडमल (एम.पी.डब्ल्यू.) आणि हसीना बिन्तेशब्बीर शेख (आरोग्य सहाय्यक) उपस्थित होते.

या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७८/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, २९६, ३५२ आणि ३५१(२) अन्वये कृष्णा प्रकाशसिंग राजपुत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम सोनवणे करीत आहेत.

Leave a Comment