‘दरमहा ५ हजार द्या, नाहीतर…’; नान्नजमध्ये ग्राम महसूल अधिकाऱ्याला धमकी

Spread the love

पैसे न दिल्यास अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; कोयता दाखविल्याचा आरोप, कार्यालयातील कागदपत्रे फेकली

जामखेड : नान्नज येथे शासकीय कामकाज करणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे दरमहा पाच हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर शिवीगाळ करून धमकावणे, कोयता दाखविणे, शासकीय कागदपत्रे ओढून फेकणे आणि धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महादेव अरुण साठे, विशाल साठे, अलोक राजू साठे आणि आकाश राजू साठे यांच्याविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्राम महसूल अधिकारी प्रीतम खाडे हे सन २०२३ पासून नान्नज येथे कार्यरत आहेत. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास खाडे हे कार्यालयात शासकीय कामकाज करत होते. त्यावेळी वरील चौघे कार्यालयात आले. ‘नान्नज येथे काम करायचे असेल तर दरमहा पाच हजार रुपये द्यावे लागतील’, अशी मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप आहे. माहिती अधिकाराचे अर्ज देऊ तसेच खोटा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याचवेळी महादेव साठे याने नारळ तोडण्याचा कोयता दाखवून पैसे देण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे घाबरून पाच हजार रुपये दिल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.

यानंतर आरोपींनी कार्यालयातील शासकीय कागदपत्रे ओढून घेऊन फेकून दिली. तसेच शासकीय कर्तव्य बजावत असताना धक्काबुक्की करून काम करण्यापासून परावृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेमुळे जीवाला धोका निर्माण झाल्याची भीती खाडे यांनी व्यक्त केली असून, भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित चौघांना जबाबदार धरावे, अशी मागणी केली आहे.

या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १३२, ३०८(६), ३०८(७), ३५२ व ३५१(२) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अजित मोरे करत आहेत.

Leave a Comment