जामखेड–माहीजळगाव महामार्गावर भीषण अपघात; दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

Spread the love

पाटोदा (गरडाचे) परिसरातील दुर्घटना; अपूर्ण रस्ता व एकेरी वाहतुकीमुळे अपघात

जामखेड : जामखेड–माहीजळगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डीवरील पाटोदा (गरडाचे) परिसरात रविवारी (दि. १९) रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. आयसर आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेमुळे ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपूर्ण अवस्थेतील महामार्गावरील काम आणि एकेरी वाहतुकीमुळे अपघात झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयसर (एमएच-१४ बीजे-२२८३) आणि हुंडाई वेन्यू (एमएच-२० जीई-३५६२) या वाहनांची पाटोदा (गरडाचे) परिसरात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात श्रीगोंदा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक विकील बहुरे आणि कुकडी पाटबंधारे उपविभाग, करमाळा येथील मोजणीदार रामचंद्र बहुरे यांचा जागीच मृत्यू झाला.

पाटोदा–रत्नापूर दरम्यान महामार्गावर पडलेल्या मोठ्या भेगांमुळे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामासाठी एका बाजूची वाहतूक बंद करून केवळ एका लेनवरून वाहने सोडण्यात येत होती. याच ठिकाणी समोरून येणाऱ्या आयसर आणि कारची जोरदार धडक होऊन हा अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिक तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघाताचा पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण इंगळे करीत आहेत.

दरम्यान, अपघातग्रस्त वाहने टोचनच्या सहाय्याने जामखेड येथे हलविण्यात आली. महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू असून, नव्याने तयार झालेल्या रस्त्यावरही मोठमोठ्या भेगा पडल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. काही ठिकाणी दुरुस्तीसाठी रस्ता खोदून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना धोका निर्माण होत असून, यापूर्वीही या मार्गावर अनेक अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

या अपघातानंतर संबंधित कंत्राटदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महामार्गावरील दुरुस्तीची कामे सुरक्षित पद्धतीने पूर्ण करून वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment

error: