अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’; १८-१९ जुलैला सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

Spread the love

विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा; भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता

अहिल्यानगर : भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १८ व १९ जुलै रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा अंदाज व्यक्त करत ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. संभाव्य हवामान परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यास भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष सतर्क राहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता दौंड पुलाजवळ भीमा नदीत ३,४७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पुढील दोन दिवसांत पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यास किंवा धरणांमधून पाणी सोडण्यात आल्यास नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढू शकते.

प्रशासनाने नदी, ओढे आणि नाल्यांवरील पूल पाण्याखाली गेल्यास ते ओलांडू नयेत, तसेच धरण परिसरात पर्यटनासाठी जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. पाण्यात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा छायाचित्रे काढू नयेत, असा इशाराही देण्यात आला आहे.

वादळी वारे आणि मेघगर्जनेच्या काळात झाडांखाली, मोकळ्या मैदानात, विजेचे खांब, टॉवर, धातूचे कुंपण किंवा विद्युत रोहित्राजवळ थांबू नये. लोंबकळणाऱ्या विद्युत तारांपासून दूर राहावे आणि वीज चमकत असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, शेतीची अवजारे तसेच दुचाकींपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाटरस्त्यांवरील प्रवास टाळावा तसेच मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाणे, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४०, तसेच ११२ आणि १०७७ हे आपत्कालीन क्रमांक उपलब्ध आहेत.

Leave a Comment

error: