जामखेड तालुक्यात शेवगा, द्राक्ष, केळी, डाळिंब लागवडींसह स्मार्ट प्रकल्पाची पाहणी
जामखेड: कृषी विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी जामखेड तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून शेती प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देत पीक व्यवस्थापन, फळबागांची निगा, मूल्यवर्धन आणि शासकीय योजनांच्या प्रभावी वापराबाबत मार्गदर्शन केले.
जामखेड दौऱ्याची सुरुवात खर्डा मंडळातील आबा इंगोले यांच्या शेवगा लागवडीच्या पाहणीने झाली. शेवगा पिकातील खत व पाणी व्यवस्थापन, रोग-कीड नियंत्रण, उत्पादनवाढ आणि दर्जेदार उत्पादनासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यानंतर नान्नज मंडळातील पिंपळगाव आळवा येथे फार्मर कप उपक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या अमीर शेतकरी गटाला भेट देण्यात आली. गटशेतीच्या माध्यमातून उत्पादन खर्चात बचत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बाजारपेठेतील स्पर्धात्मकता आणि कृषी विभागाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याबाबत त्यांनी शेतकरी गटाशी संवाद साधला.
त्यानंतर पाडळी येथे स्मार्ट प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या क्लिनिंग, ग्रेडिंग व गोदाम प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. शेतमालाची स्वच्छता, वर्गवारी, साठवणूक आणि मूल्यवर्धनासाठी अशा सुविधा महत्त्वपूर्ण ठरत असून, त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस होणार असल्याचे बोराळे यांनी सांगितले.
दौऱ्याच्या अखेरीस नान्नज येथील प्रगतशील शेतकरी त्रिंबक कुमटकर यांच्या द्राक्ष, केळी व डाळिंब लागवडीची पाहणी करण्यात आली. फळबाग व्यवस्थापन, ठिबक सिंचन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण तसेच बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी उत्पादनासोबतच गुणवत्तेलाही प्राधान्य देऊन बाजारपेठेच्या गरजेनुसार शेती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी रविंद्र घुले, मंडळ कृषी अधिकारी खर्डा प्रशांत पोळ, मंडळ कृषी अधिकारी नान्नज जनार्धन सरोदे, मंडळ कृषी अधिकारी जामखेड सुनील गांगर्डे, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










