राष्ट्रमाता जिजाऊंच्या स्मृतीज्योत रथयात्रेचे सोमवारी जामखेडमध्ये स्वागत

Spread the love

३५३ व्या पुण्यतिथीनिमित्त खर्डा चौकात सकाळी ११ वाजता होणार भव्य स्वागत; शिवभक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन

जामखेड: स्वराज्याच्या जननी राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या ३५३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्मृतीज्योत रथयात्रेचे सोमवारी (दि. ६) जामखेड शहरात आगमन होणार आहे. खर्डा चौक येथे सकाळी ११ वाजता अखंड मराठा समाज, मराठा सेवा संघ, पत्रकार व जामखेडकर नागरिकांच्या वतीने रथयात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

राजे लखुजीराव जाधवराव यांच्या वंशजांच्या पुढाकारातून ही रथयात्रा जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा ते किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडपर्यंत काढण्यात येत आहे. रविवारी (दि. ५) सकाळी सिंदखेडराजा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत रथयात्रेला प्रारंभ झाला. प्रारंभी तेथील पाच पवित्र विहिरींच्या जलाचे विधिवत पूजन करण्यात आले. हे पवित्र जल रथयात्रेसह पाचाड येथे नेण्यात येणार असून, जिजाऊंच्या समाधीस्थळी त्याचा जलाभिषेक करण्यात येणार आहे.

रथयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांचा, कार्याचा आणि स्वराज्य उभारणीत त्यांनी दिलेल्या संस्कारांचा जागर करण्यात येत आहे. राज्यातील विविध शहरांतून मार्गक्रमण करणारी ही रथयात्रा जामखेडमध्ये दाखल होत असून, शिवप्रेमी व जिजाऊप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

रथयात्रेच्या स्वागतासाठी खर्डा चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिवभक्त, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवक तसेच नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होऊन राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: