जामखेडच्या आरोळेनगरमधील घटना; अज्ञातांविरुद्ध गुन्हा, परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी
जामखेड: जामखेड शहरातील आरोळेनगर परिसरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नुकतेच बसविण्यात आलेल्या लोखंडी प्रवेशद्वाराची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत २ जुलै रोजी शाळेच्या पूर्व बाजूस लोखंडी प्रवेशद्वार बसविण्यात आले होते. शाळा परिसरातील अनधिकृत वावर रोखणे आणि निवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. मात्र त्याच रात्री अज्ञात व्यक्तींनी गेटचे कुलूप तोडून प्रवेशद्वार बाजूला ढकलले. या प्रकारात सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर मुख्याध्यापक राहुल दळवी यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार संजय लोखंडे करीत आहेत.
या शासकीय परिसरात अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह कार्यरत आहे. परिसरात काही स्थानिकांकडून अनधिकृत ये-जा, वाहनतळाचा वापर, कचरा टाकणे, सांडपाणी सोडणे, संरक्षक भिंतीचे नुकसान करणे तसेच शासकीय मालमत्तेची हानी करण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याची नोंद समाज कल्याण विभागाने केली आहे. या प्रकारांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकावण्याच्या घटनाही घडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी पोलीस अधीक्षक व तहसीलदार यांना पत्र पाठवून परिसरात दिवस-रात्र पोलीस गस्त वाढविणे, अनधिकृत वावरास प्रतिबंध करणे तसेच विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गंभीर दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.










