“इथे मोटारसायकल का लावली? तुम्ही मंदिरात जायचे नाही!” म्हणत संताप; एकावर डोक्यात दगडाने वार, दुसरा जखमी; जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

Spread the love

जामखेड : देवदर्शनासाठी गेलेल्या दोन मित्रांवर मंदिरासमोर मोटारसायकल उभी केल्याच्या क्षुल्लक कारणावरून दगडाने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील बटेवाडी शिवारात घडली. या हल्ल्यात मुकुंद रघुनाथ पोकळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेले शिवाजी मधुकर मोरे हे देखील जखमी झाले आहेत. या प्रकरणी बाळू उर्फ दिपक मनोहर खरात (रा. बटेवाडी, ता. जामखेड) याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी मधुकर मोरे (वय ५३, व्यवसाय – वॉशिंग सेंटर, रा. पोकळेवस्ती, जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १५ जून रोजी दुपारी शिवाजी मोरे व त्यांचे मित्र मुकुंद रघुनाथ पोकळे हे देवदैठण येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परत येत असताना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी बटेवाडी शिवारातील खर्डा रोडवरील मारुती मंदिराजवळ मोटारसायकल थांबवली.

दोघेही दर्शनासाठी मंदिराकडे जात असताना तेथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांना अडवले. “इथे मोटारसायकल का लावली? तुम्ही मंदिरात जायचे नाही,” असे म्हणत त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने मोटारसायकलची चावी काढून घेत वाहन खाली पाडले. त्यामुळे मोटारसायकलवर बसलेले मुकुंद पोकळे खाली कोसळले.

वाद सुरू असतानाच आरोपीने मंदिर परिसरातील नारळ फोडण्यासाठी वापरण्यात येणारा मोठा दगड उचलला आणि मुकुंद पोकळे यांच्या डोक्यात जोरदार मारला. गंभीर जखमी झालेल्या मुकुंद यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला आणि ते जागीच कोसळले.

मित्राला वाचविण्यासाठी शिवाजी मोरे धावले असता आरोपीने त्यांच्यावरही त्याच दगडाने हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर, उजव्या खांद्यावर व पायावर वार करण्यात आले. या हल्ल्यात तेही जखमी झाले.

घटनेनंतर जखमी शिवाजी मोरे यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा शर्ट काढून मुकुंद पोकळे यांच्या डोक्यावर बांधला. त्यानंतर दोघांनीही कशीबशी मोटारसायकल सुरू करून जामखेड येथील पवार हॉस्पिटल गाठले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

मुकुंद पोकळे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ते अद्याप बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे.

मारहाणीनंतर आरोपीने “माझे नाव बाळू आहे. पोलीस स्टेशनला गेलात तर तुमचे काही खरे नाही,” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, झटापटीदरम्यान मुकुंद पोकळे यांचा विवो कंपनीचा मोबाईल फोन हरविल्याचेही सांगण्यात आले आहे.

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांकडून आरोपीचे नाव बाळू उर्फ दिपक मनोहर खरात असल्याची माहिती जखमींना मिळाली.

शिवाजी मोरे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी बाळू उर्फ दिपक मनोहर खरात याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण, दमदाटी व अन्य संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे करीत आहेत.

Leave a Comment

error: