जामखेड: जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथे महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षण योजनेअंतर्गत आयोजित ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ शिबिराचा समारोप अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. दहा दिवस चाललेल्या या शिबिरामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मसंरक्षणाची जाणीव अधिक दृढ झाली.
समारोपप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आत्मरक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक मुलगी निर्भय बनू शकते आणि सुरक्षित समाज घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.” त्यांनी आत्मविश्वास, शिस्त आणि सातत्य या यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेल्या गुणांवर विशेष भर दिला. तसेच, संकटाच्या वेळी घाबरून न जाता धैर्याने परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद या प्रशिक्षणातून मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
या शिबिरात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थाचे प्रशिक्षक संतोष थोरात यांनी विद्यार्थिनींना विविध अंगांनी प्रशिक्षण दिले. योग, ध्यान, प्राणायाम, सूर्यनमस्कार, शारीरिक संतुलन, योग्य आसनपद्धती, तसेच मानसिक स्थैर्य आणि तणावमुक्त जीवनशैली यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच मानवी शरीररचना, शरीरक्रिया, किशोरवयीन आरोग्य आणि सुरक्षितता मार्गदर्शक तत्त्वे यांचीही माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली.

शिबिरामध्ये स्वसंरक्षणाच्या विविध तंत्रांचा प्रत्यक्ष सराव करून विद्यार्थिनींना आत्मनिर्भर बनविण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढून संकटांना सामोरे जाण्याची मानसिक व शारीरिक ताकद निर्माण झाली.
कार्यक्रमास सरपंच दिगंबर ढाळे, मुख्याध्यापक संतोष गोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेवन्नाथ ढाळे, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सदस्य अक्षय वायभासे, पोलीस पाटील अर्जुन ढाळे, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ चे साधक प्रकाश सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत मस्के तसेच शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री रविशंकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अशोक जाधव, बाळासाहेब खेडकर, मल्हारी पाखरे, संतोष खेडकर आणि रवींद्र धस यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना केवळ आत्मरक्षणाचे धडेच नव्हे, तर आयुष्यभर उपयोगी पडणारी जीवनमूल्ये मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करून मुलींना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनवावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.










