उष्णतेनंतर ‘निसर्गाचा पलटवार’! राज्यात वादळी पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा कहर, पुढील ४८ तास धोक्याचे, अहिल्यानगरसह २४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’!

Spread the love

जामखेड: महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी कडाक्याच्या उन्हाने हैराण केलेल्या नागरिकांना आता अचानक बदललेल्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. उष्णतेनंतर अवकाळी पावसाने राज्यभर हजेरी लावत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीटीमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. मंगळवारी अनेक भागांत उष्णता, पाऊस आणि गारपीट अशा तिहेरी संकटाचा अनुभव आला.

India Meteorological Department (IMD) ने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून बुधवार (१८ मार्च) रोजीही वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता कायम आहे. राज्यातील सुमारे २४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भात अवकाळी पावसाचे सावट अधिक तीव्र झाले आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. या भागात पुढील दोन दिवस विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यातही हवामान ढगाळ राहणार असून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत विजांसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तापमानात किंचित घट झाली असली तरी उकाडा कायम असल्याने नागरिकांना दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे. १९ मार्चसाठी या भागातही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईसह कोकणात उष्ण आणि दमट हवामानात काहीसा दिलासा मिळाला असला तरी आता वादळी पावसाने पुन्हा जोर धरला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पुढील ४८ तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस राहील, तर हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. काढणीस आलेली पिके सुरक्षित ठेवणे, जनावरांची काळजी घेणे आणि वादळी वाऱ्यापासून बचाव करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांनी विजांच्या कडकडाटावेळी उघड्यावर थांबणे टाळावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑरेंज अलर्ट: धोक्याचा इशारा (१८ जिल्हे)

राज्यातील १८ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या भागांत ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर, विदर्भातील वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर तसेच मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली हे जिल्हे या इशाऱ्याखाली आहेत.

येलो अलर्ट: सतर्कतेचा इशारा

राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून या भागांत हवामान अचानक बदलण्याची शक्यता आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. विदर्भातील नागपूर, गोंदिया आणि भंडारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: