जामखेड : राज्यातील महत्त्वाकांक्षी चोंडी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी प्रकल्पाचे उपविभाग करून टप्प्याटप्प्याने आवश्यक परवानग्या मंजूर करण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रशासनाला दिले. चोंडी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी सकारात्मक व समन्वयपूर्ण दृष्टिकोन ठेवून काम करावे, असेही त्यांनी सांगितले. “प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करून कामे टप्प्याटप्प्याने पुढे नेल्यास प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतो,” असे मत प्रा. शिंदे यांनी व्यक्त केले.
बैठकीत चोंडी प्रकल्पाच्या विविध घटकांबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. प्रकल्पाची सध्याची स्थिती, प्रलंबित परवानग्या, तांत्रिक बाबी, निधीची तरतूद तसेच पुढील कार्ययोजना यावर सखोल चर्चा झाली. आवश्यक त्या परवानग्या वेळेत मिळाव्यात यासाठी संबंधित विभागांनी तातडीने पाठपुरावा करावा, असे निर्देश देण्यात आले.
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी श्री. पंकज आशिया हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस सहभागी झाले होते. त्यांनी जिल्हास्तरावरील समन्वय आणि प्रशासकीय कार्यवाहीबाबत माहिती दिली. या बैठकीस सं. द. चोपडे (मु.अ. पुणे SP), विवेक क. माकुंदे (ऊ. रा. कां. मंडळ, अहिल्यानगर), किण रुलमदानी (आर्किटेक्ट कीमया), अंजली कलमदानी (आर्किटेक्ट), इंजि. लक्ष्मीकांत जाधव (का. अ.सा. बांधकाम विभाग, अहमदनगर), प्रवीण घोरपडे (कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. ०२, श्रीगोंदा), उत्तम धायगुडे (कार्यकारी अभियंता, कुकडी विभाग, कोळवाडी), नितीन पाटील (उपअभियंता, कर्जत), प्रशांत वाकचौरे (सहाय्यक अभियंता, सां.बा. कर्जत) तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
चोंडी प्रकल्प हा स्थानिक विकास, पायाभूत सुविधा बळकटीकरण आणि नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वाचा मानला जात असून, या प्रकल्पाच्या वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्णतेसाठी सर्व स्तरांवर समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला. प्रकल्पाच्या कामाला आता अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.