१० वर्षांचा वाद संपला! जामखेड तालुक्यातील बंद शिवरस्ते अखेर खुले

Spread the love

जामखेड | जामखेड तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेले महत्त्वाचे शिवरस्ते महसूल प्रशासनाने खुल्या करून ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे. जवळके ते सोनेगाव तसेच जवळके ते वाघा आणि वाकी ते आपटी या गावांना जोडणारे शिवरस्ते व शेतरस्ते खुल्या करण्यात आल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

जवळके ते सोनेगाव हा शिवरस्ता मागील दहा वर्षांपासून वादाच्या कारणामुळे बंद होता. तहसीलदार मच्छिंद्र पाडाळे यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीने हा रस्ता खुला केला. या निर्णयामुळे परिसरातील सुमारे २५० ते ३०० नागरिक व शेतकऱ्यांना थेट लाभ झाला असून, त्यांच्या दळणवळणाची व वहिवाटीची मोठी अडचण दूर झाली आहे.

याशिवाय जामखेड तालुक्यातील मौजे जवळके ते मौजे वाघा या दोन गावांना जोडणारा महत्त्वाचा शिवरस्ता तसेच मौजे वाकी ते आपटी या गावांना जोडणारा शेतरस्ताही महसूल प्रशासनाने मोकळा केला आहे. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांची शेतीकामासाठी होणारी गैरसोय दूर झाली असून, वाहतूक अधिक सुलभ झाली आहे.

ही कार्यवाही तहसीलदार मच्छिंद्र पाडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी आय. ए. न. काळे, मंडळ अधिकारी नान्नज, सुवर्णा इकडे तसेच ग्राम महसूल अधिकारी आकाश काशीकेदार आदी अधिकाऱ्यांनी पार पाडली.

महसूल प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागले असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“जवळके ते सोनेगाव हा रस्ता दहा वर्षांपासून बंद होता, तर जवळके ते वाघा आणि वाकी ते आपटी रस्त्यांनाही पूर्वी अडथळे होते. प्रशासन आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे हे सर्व रस्ते अखेर खुला केले गेले आहेत. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचे दळणवळण तसेच शेतीकाम आता अधिक सुकर झाले आहे.”

मच्छिंद्र पाडाळे – तहसिलदार, जामखेड

Leave a Comment

error: