मुंबई| राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे हजारो पात्र महिलांचा लाभ जानेवारी महिन्यात थांबला आहे. ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले गेल्याने अनेक महिलांना ‘अपात्र’ ठरवण्यात आल्याचे समोर आले असून, यामुळे राज्यभरात महिलांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती देताना सांगितले की, “महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, ई-केवायसी करताना काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्याचे निदर्शनास आले आहे.”ई-केवायसी प्रक्रियेत विचारण्यात आलेले काही प्रश्न गोंधळात टाकणारे असल्याने, अनेक महिलांना नेमका कोणता पर्याय निवडायचा हे समजले नाही. यामुळे पात्र असूनही हजारो महिलांचे अर्ज फेटाळले गेले आणि नियमितपणे मिळणारा दरमहा १,५०० रुपयांचा हप्ता अचानक बंद झाला.
शासनाने सुरुवातीला १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसीची मुदत दिली होती. त्यानंतर ती ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत वाढवण्यात आली. डिसेंबरच्या मध्यात ई-केवायसीतील प्रश्नांमध्ये सुधारणा करण्यात आली होती आणि आधी केवायसी केलेल्या महिलांनाही पुन्हा अर्ज एडिट करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, या बदलांची पुरेशी जनजागृती न झाल्याने अनेक महिलांना याची माहिती मिळाली नाही.
दरम्यान, मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, “या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष (Physical Verification) पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.” त्यामुळे चुकीच्या ई-केवायसीमुळे लाभ बंद झालेल्या महिलांना पुन्हा संधी मिळणार आहे.
जानेवारी महिन्यात हप्ता जमा न झाल्याने अनेक ठिकाणी महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, शासनाकडून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
ई-केवायसीतील या चुका नडल्या
ई-केवायसी करताना गोंधळून टाकणारे प्रश्न विचारले गेले होते. उदा. ‘लाभघेणाऱ्या महिलेच्या घरात कोणीही शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नाही,’ असा प्रश्न होता व खाली होय किंवा नाही असे दोन पर्याय होते. यात ‘होय’ हे उत्तर बरोबर होते. परंतु अनेक महिलांनी यात ‘नाही’ हा पर्याय निवडला. त्यामुळे अनेकांचा लाभ बंद झाला असण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींचे चुकीचे अर्ज होणार दुरुस्त
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. तथापि, काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.










