पहाटेची दुर्दैवी घटना; अंधारात पुलाच्या कामाचा अंदाज न आल्याने अपघात
जामखेड : जामखेड–माहीजळगाव महामार्गावरील भातोडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे नदीवरील पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी शुक्रवारी पहाटे भीषण अपघात घडला. पुलासाठी करण्यात आलेल्या खोल खड्ड्याचा अंधारात अंदाज न आल्याने मोटारसायकल थेट खड्ड्यात कोसळली. या अपघातात जामखेड येथील बालाजी विलास पागिरे (वय २५, रा. मतेवाडी, ता. जामखेड, हल्ली मुक्काम पोकळे वस्ती, जामखेड) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने जामखेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी पागिरे हे जामखेड शहरातील अवधूत हॉटेल येथे वेटर म्हणून काम करत होते. शुक्रवारी पहाटे ते हरिनारायण आष्टा (ता. आष्टी) येथून मोटारसायकलवरून जामखेडकडे येत होते. भातोडी गावाजवळ नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी पुलासाठी मोठा खड्डा करण्यात आला आहे. पहाटे अंधार असल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांची मोटारसायकल थेट खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सकाळी ग्रामस्थांची ये-जा सुरू झाल्यानंतर पुलाखाली मोटारसायकलसह एक तरुण पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याचदरम्यान मृताच्या मोबाईलवर अवधूत हॉटेलच्या मालकाचा फोन आला. ग्रामस्थांनी फोन उचलून अपघाताची माहिती दिल्यानंतर हॉटेल मालक तातडीने घटनास्थळी पोहोचले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रुग्णवाहिका आणि आष्टी पोलिसांना कळविले. जखमी तरुणाला रुग्णवाहिकेतून जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असून आष्टी पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे मतेवाडी व जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे. मेहनती व मनमिळावू स्वभावामुळे परिचित असलेल्या बालाजी पागिरे यांच्या अकाली निधनाने नातेवाईक, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.









