जवळ्यात आजपासून खाकसार वलीबाबांचा उरूस, तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Spread the love

जामखेड : जामखेड तालुक्यातील जवळा येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सय्यद नूर खाकसार वलीबाबा यांच्या ४४ व्या उरूसास आज, शनिवारपासून (ता. २४) प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उरूसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, संदल मिरवणूक, कव्वाली आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या उरूसातून जवळा परिसरातील सर्वधर्मीय ऐक्य आणि बंधुभावाची परंपरा जपली जाते.

उरूसाच्या पहिल्या दिवशी आज गुसूल, कुराणखानी आणि मिलाद हे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यावेळी कुराणाचे पठण करण्यात येणार असून, खाकसार वलीबाबा यांची कबर आणि दर्गा शुद्ध पाण्याने धुऊन गुलाबपाणी व अत्तराने स्वच्छ करण्यात येईल. त्यानंतर कबरीची पूजा करून मानाचा गल्लफ चढविण्यात येणार आहे.

रविवारी संदल मिरवणूक

उरूसाचा मुख्य दिवस रविवारी (ता. २५) असून, या दिवशी संदल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दर्ग्याचे प्रतीक तयार करून जवळा गावातून सवाद्य संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत गावातील तसेच बाहेरगावाहून आलेले विविध जाती-धर्मांचे भाविक उत्साहाने सहभागी होतात. मिरवणुकीनंतर दर्ग्याचे मुजावर कबरीची पूजा करून फुलांची चादर अर्पण करतील. यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

रविवारी मुंबईचे प्रसिद्ध कव्वाल गायक नईम हाशिम चिस्ती यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. उरूसाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी (ता. २६) मुस्लिम बांधवांसह अन्य धर्मीय भाविक दर्ग्यात फुलांची चादर अर्पण करून नैवेद्य दाखवतील. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

१९८४ पासून उरूसाची परंपरा

स्वर्गीय सय्यद बुरहानहबीब शाह यांनी १९८४ मध्ये स्वखर्चातून खाकसार वलीबाबा यांचा दर्गा उभारला. त्यानंतर या ठिकाणी उरूस साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. हा दर्गा जवळा आणि परिसरातील सर्वधर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखला जातो. सय्यद बुरहानहबीब शाह यांच्या पश्चात त्यांचे पुत्र तथा दर्ग्याचे मुजावर सय्यद अमीन बुरहान शाह हे दर्ग्याची सेवा आणि देखभाल करीत आहेत.

श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक सलोख्याचा संगम असलेल्या या उरूसात दरवर्षी विविध धर्मांचे भाविक सहभागी होतात. यंदाच्या ४४ व्या उरूसानिमित्त आयोजित कार्यक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment