जामखेड: मित्राच्या लग्नासाठी आष्टी येथे गेलेला जामखेडमधील ३० वर्षीय तरुण दोन दिवसांपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्यानंतर, बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. शुभम बाळू डाडर असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे जामखेडसह परिसरात मोठी खळबळ उडाली असून, त्याच्या मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड शहरातील सदाफुले वस्ती येथे राहणारा शुभम डाडर हा गुरुवारी (१५ ऑक्टोबर) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मित्राच्या लग्नासाठी आष्टीला जात असल्याचे सांगून घरून निघाला होता. दुपारी साडेबारा वाजता त्याच्या आईने फोन केला असता, तो लग्नात असल्याचे त्याने सांगितले होते. आईने त्याला लवकर घरी येण्यास सांगितले असता, शुभमनेही परतण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही.
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शुभमचा भाऊ नागेश याने घरी फोन करून शुभम अजून परतला नसल्याची माहिती दिली. कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, सुरुवातीला त्याने फोन उचलला नाही आणि नंतर त्याचा मोबाईल बंद येऊ लागला. यामुळे चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी नातेवाईक व मित्रांकडे शोधाशोध केली; परंतु काहीच पत्ता लागला नाही. अखेर त्याच्या आई मनीषा डाडर यांनी जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तीने त्याला अज्ञात कारणातून पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा संशय नोंदवून तपास सुरू केला होता.
दरम्यान, शनिवारी (१७ ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील नदीपात्रात एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आणि ओळख पटवली असता, हा मृतदेह बेपत्ता शुभम डाडर याचाच असल्याचे निष्पन्न झाले.
मित्राच्या लग्नासाठी गेलेला तरुण अवघ्या दोन दिवसांत मृतावस्थेत आढळल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. शुभमचा मृत्यू नेमका कसा झाला, तो सौताडा येथील नदीपात्रापर्यंत कसा पोहोचला आणि यामागे काही घातपात आहे का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
शुभमचा मृत्यू हत्या, आत्महत्या की अन्य कोणत्या कारणांमुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल (Postmortem Report) आणि पोलिसांच्या सखोल तपासानंतरच मृत्यूचे सत्य समोर येईल. पाटोदा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, या रहस्यमय मृत्यूचा लवकरात लवकर उलगडा व्हावा, अशी मागणी जामखेड व पाटोदा परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तरुण मुलाच्या अशा अचानक जाण्याने डाडर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.








