नान्नज दरोड्याचा अवघ्या ५ दिवसांत उलगडा: महिला सूत्रधारासह ५ जणांना LCB कडून अटक; ६.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love
  • जामखेड व खर्डा परिसरातील घरफोडीचे ९ गुन्हे उघड; ११ वर्षांपासून फरार दरोडेखोरही गळ्यात

जामखेड : तालुक्यातील नान्नज येथील गोरे कुटुंबीयांच्या घरावर पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्याचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या पाच दिवसांत अत्यंत कौशल्याने उलगडा केला आहे. चार महिन्यांच्या चिमुकल्याच्या जिवाचा व महिलांच्या गळ्यावर कोयत्याचा धाक दाखवून करण्यात आलेल्या या थरारक दरोड्याचा कट एका महिलेने रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पिंपळगाव आवळा व वाकी परिसरातून ५ दरोडेखोरांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून ६ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे जामखेड व खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे तब्बल ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

जनक्षोभ, रस्ता रोको अन् राम शिंदेंचा थेट हस्तक्षेप

२ ऑक्टोबर रोजी भल्या पहाटे नान्नज येथील शिवाजीनगर मदरसा परिसरात मनिषा गोरे यांच्या घरात घुसून दरोडेखोरांनी अंगाचा थरकाप उडवणारा दरोडा टाकला होता. या घटनेनंतर फिर्याद नोंदवताना पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप करत गोरे कुटुंबीय व संतप्त ग्रामस्थांनी ३ ऑक्टोबर रोजी जामखेड-करमाळा महामार्गावर सुमारे ३ तास रस्ता रोको आंदोलन केले होते. चार महिन्यांच्या चिमुकल्याला कडेवर घेऊन महिला महामार्गावर उतरल्याने प्रशासनाची पळापळ झाली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ४ ऑक्टोबर रोजी पीडित गोरे कुटुंबाची भेट घेऊन धीर दिला. तसेच घटनास्थळावरूनच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याशी संपर्क साधून तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व विशेष पथके तैनात करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.

‘एलसीबी’चे धडक ऑपरेशन: ५ आरोपी गजाआड

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचनेनुसार LCB चे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत सालगुडे व पथकाला तपासासाठी रवाना केले. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा दरोडा पिंपळगाव आवळा येथील प्रदिप उर्फ गुड्या काळे याने त्याच्या टोळीसह केल्याची पक्की माहिती मिळताच पथकाने सापळा रचून ५ जणांना ताब्यात घेतले:

  1. प्रदिप उर्फ गुड्या बिडकुत्या काळे (वय ३०, रा. पिंपळगाव आवळा, ता. जामखेड)
  2. अनिल सुल्या पवार (वय ३४, रा. पिंपळगाव आवळा)
  3. सुविकास बिडकुत्या काळे (वय ४५, रा. पिंपळगाव आवळा)
  4. रूक्या उर्फ लोकेश बिडकुत्या काळे (वय ३५, रा. पिंपळगाव आवळा)
  5. समाधान उर्फ कारभारी दिपक काळे (वय २१, रा. वाकी, ता. जामखेड)

महिला सूत्राचे नियोजन; दागिने विकून होणार होती वाटणी

मुख्य आरोपी प्रदिप काळे याने पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीनुसार, हा संपूर्ण दरोडा चोभेवाडी येथील सारिका चंदन काळे हिच्या नियोजनानुसार व सांगण्यावरून टाकण्यात आला होता. लुटलेले सोन्याचे दागिने सारिका व तिचा पती परबत शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते. ते सोने विकून सर्व दरोडेखोरांना पैसे वाटून दिले जाणार होते.

चार आरोपी फरार: या प्रकरणातील सूत्रधार सारिका चंदन काळे (रा. चोभेवाडी), लवचिक्या उर्फ लहु जालींदर पवार (रा. घोडेगाव), सोन्या नंग्या काळे (रा. धनेगाव) आणि परबत उर्फ प्रभाकर शिंदे (रा. कोरफळे, ता. बार्शी) हे चौघे सध्या फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

घरफोडीचे ९ गुन्हे उघडकीस; ६.९२ लाखांचे सोने जप्त

अटक आरोपी समाधान काळे याच्याकडे कसून चौकशी केली असता, या टोळीने जामखेड तालुक्यातील राजुरी, डोळेवाडी, आरणगाव, धामनगाव, वंजारवाडी, बुऱ्हाणपूर आणि चाँडी येथेही रात्रीच्या वेळी घरफोड्या केल्याची कबुली दिली. चोरीचे दागिने त्यांनी वाकी येथील भाऊ बिभीषण सावंत व हनुमंत आबासाहेब वायकर यांच्याकडे ठेवण्यास दिले होते.

पोलिसांनी या दोघांना नोटीस बजावून त्यांच्याकडून ६ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचे ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने (बोरमाळ, गंठण, मंगळसूत्र, मणी व कर्णफुले) पंचासमक्ष जप्त केले आहेत. या कारवाईमुळे जामखेड पोलीस ठाण्यातील ८ आणि खर्डा पोलीस ठाण्यातील १ असे एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

११ वर्षांपासून फरार दरोडेखोर जाळ्यात

अटक करण्यात आलेला आरोपी रूक्या उर्फ लोकेश काळे हा २०१५ मधील दरोड्याच्या एका गंभीर गुन्ह्यात (भादंवि ३९४) गेल्या ११ वर्षांपासून फरार होता. त्यालाही या कारवाईत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सर्व आरोपींना मुद्देमालासह पुढील न्यायालयीन व तपासाच्या कारवाईसाठी जामखेड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोउपनि अनंत सालगुडे, अंमलदार निळकंठ कारखेले, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, बाळासाहेब खेडकर, अमोल आजवे, प्रकाश मांडगे, प्रशांत राठोड, सुनिता पवार व अरूण मोरे यांच्या पथकाने केली.

Leave a Comment