जामखेड: जामखेड शहराचा श्वास गुदमरवणारी जीवघेणी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी ज्या ‘धडक अतिक्रमण हटाव मोहिमेचा’ डंका वाजवला होता, त्या मोहिमेचा दुसऱ्याच दिवशी पुरता बोजवारा उडाला आहे. बीड रोडवरील गोरगरिबांच्या टपऱ्या आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांवर १० फुटांपर्यंत निर्दयपणे हातोडा चालवणारा प्रशासकीय ‘बुलडोझर’ समर्थ हॉस्पिटल ते बीड रोड कॉर्नर दरम्यान येताच अचानक थंड पडला. त्यामुळे बड्या धनदांडग्यांचे साम्राज्य आणि वजनदार प्रस्थापितांचे अवाढव्य इमले वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी स्वतःला लक्ष्मीपुत्रांच्या दावणीला बांधत आहेत का? असा जळजळीत सवाल आता संतप्त जामखेडकर विचारत आहेत.
पहिल्या दिवशी ‘धाडस’, दुसऱ्या दिवशी ‘माघार’!
गेल्या तीन वर्षांपासून धुळखात पडलेल्या या मोहिमेचा श्रीगणेशा मंगळवारी सकाळी १० वाजता बीड रोडवरील शासकीय दूध डेअरी परिसरापासून झाला. महसूल, नगरपरिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस प्रशासनाचा भलामोठा लवाजमा रस्त्यावर उतरला होता. तहसीलदार शितल सावळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे आणि पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या थेट उपस्थितीत राष्ट्रीय महामार्गाच्या गटारापासून दोन्ही बाजूंना सुमारे १० फूट (३ मीटर) अंतरातील अतिक्रमणे हटवण्यास धडक सुरुवात झाली. पहिल्या दिवशी प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत लहान-मोठ्या टपऱ्या भुईसपाट करून रस्ता मोकळा केला. मात्र, बुधवारी दुसऱ्या दिवशी अचानक कारवाईची ‘हवा’ निघून गेल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कारवाई सोडून उपअभियंता हॉटेलमध्ये निवांत! पत्रकारांशी अरेरावी अन् तीव्र निषेध
एकडे मोहिमेचा फज्जा उडालेला असताना दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता सुजित चेमटे हे बीड रोडवरील एका हॉटेलमध्ये निवांत बसून आराम फरमावत होते. दुपारपासून काम का बंद आहे, असा रोकडा सवाल पत्रकारांनी विचारताच चेमटे यांचा उर्मटपणा उघडा पडला. “मी तुम्हाला बांधील नाही, तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. हे प्रश्न राष्ट्रीय महामार्ग अधिकारी ज्योती शिंदे यांना विचारा!” अशी बेजबाबदार भाषा वापरून त्यांनी तिथून पळ काढला.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांशी अशा प्रकारे उर्मटपणे वागणाऱ्या चेमटे यांच्या पळपुट्या भूमिकेमुळे पत्रकारांमध्ये संतापाचा उद्रेक झाला. सर्व पत्रकारांनी तात्काळ प्रांताधिकारी नितीन पाटील व तहसीलदार शितल सावळे यांची भेट घेऊन घडलेल्या सर्व प्रकाराचा पाढा वाचला आणि उपअभियंता चेमटे यांचा तीव्र निषेध नोंदवला. पत्रकारांशी उद्धटपणे बोलणाऱ्या या अधिकाऱ्यावर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता पत्रकारांनी लावून धरली आहे.
मोजणीचा सावळागोंधळ अन् व्यापाऱ्यांचा सवाल: “नियम अन् न्याय सर्वांना समान असावा!”
दुसऱ्या दिवशी कारवाई थंडावण्यामागे राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि भूमिअभिलेख विभाग यांच्या मोजमापातील तफावत हे ढोंग पुढे आले आहे. या गोंधळावर बोट ठेवत जामखेडच्या व्यापाऱ्यांनी तहसीलदार शितल सावळे यांना थेट निवेदन देऊन प्रशासकीय दुटप्पीपणाचा बुरखा फाडला आहे.
व्यापाऱ्यांनी प्रशासनासमोर ठाम भूमिका मांडली आहे:
- पारदर्शक मोजणी व्हावी: आधी झालेली अधिकृत मोजणीच कायम ठेवावी आणि गटारापासून १० फुटांची मर्यादा स्पष्टपणे निश्चित करावी.
- स्वेच्छेने अतिक्रमण काढण्याची तयारी: मोजणी अधिकृत आणि स्पष्ट असेल, तर जिथे प्रत्यक्ष अतिक्रमण असेल ते व्यापारी स्वतःहून काढून घेण्यास तयार आहेत.
- विकासाला विरोध नाही: “आमचा विकासाला अजिबात विरोध नाही, मात्र विकास पारदर्शक प्रक्रियेतून आणि समान निकषांवर व्हावा. आज कित्येक व्यापाऱ्यांचे व्यवसाय, उपजीविका आणि आयुष्यभराची मेहनत या निर्णयावर टांगणीला लागली आहे. त्यामुळे मोजणी एकच असावी, नियम एकच असावा आणि न्यायही सर्वांसाठी समान असावा!”
गरिबांवर तत्परता, बड्यांवर मेहेरबानी?
कोणतीही सवलत न देता हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांचे धंदे क्षणात उद्ध्वस्त करून त्यांना रस्त्यावर आणणाऱ्या प्रशासनाने, समर्थ हॉस्पिटल ते बीड रोड कॉर्नर दरम्यानच्या मातब्बर धेंडांच्या पक्क्या अन् अवाढव्य बांधकामांवर कारवाईची वेळ येताच नांगी टाकली आहे. श्रीमंत बड्या व्यापाऱ्यांच्या अन् अब्जाधीश प्रस्थापितांच्या अतिक्रमणांसमोर प्रशासन लाचार झाल्याचे चित्र बीड रोडवर स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
जामखेडकरांचा थेट सवाल:
“कायदा आणि नियम काय फक्त गरिबांच्या टपऱ्यांपुरताच मर्यादित आहे का? धनदांडग्यांच्या बेकायदेशीर इमल्यांसमोर प्रशासन गुडघे का टेकते? जर वजनदार प्रस्थापितांना अभय देऊन कारवाई अर्ध्यावरच गुंडाळायची होती, तर गरिबांचे संसार रस्त्यावर आणण्याचा अट्टहास कशासाठी?”









