जवळा-मतेवाडीतील काळीज पिळवटून टाकणारी घटना; ‘देवांश’च्या जाण्याने मते कुटुंबावर दुःखाचा डोंगर
जामखेड: एकीकडे घरोघरी गणपती बाप्पाच्या स्थापनेचा उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि आनंदाचे वातावरण असतानाच, जवळा-मतेवाडी परिसरात मात्र काळाने अत्यंत क्रूर घाला घातला आहे. सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) मतेवाडी येथे घडलेल्या एका काळीज पिळवटून टाकणाऱ्या अपघातात देवांश सचिन मते या अवघ्या सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मते कुटुंबातील एकुलत्या एका बाळाचा असा अचानक अंत झाल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून नागरिकांमधून जवळा-मतेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवांशचे वडील सचिन सुग्रीव मते हे स्वतः शेतातील मका कुट्टी करण्याचे काम उरकून ट्रॅक्टर घेऊन घराच्या परिसरात आले होते. त्यावेळी सव्वा वर्षाचा निष्पाप देवांश घराच्या अंगणात खेळत होता. खेळता खेळता तो कधी ट्रॅक्टरच्या जवळ गेला, हे वडिलांच्या लक्षातच आले नाही. याच दरम्यान ट्रॅक्टर हलवताना देवांश नकळत ट्रॅक्टरच्या मागच्या चाकाखाली आला. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने चिमुकल्या देवांशचा जागीच प्राण गेला.
गणेश स्थापनेच्या अत्यंत पवित्र आणि आनंदाच्या दिवशीच घडलेल्या या हृदयद्रावक घटनेची बातमी परिसरात पसरताच मते कुटुंबीयांच्या घरी नातेवाईक, ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली. देवांश हा सचिन मते यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अशा जाण्याने मते कुटुंबीय पूर्णपणे कोलमडून गेले आहे.









