जामखेडजवळील लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्रात मध्यरात्री तुफान राडा

Spread the love

‘बैठक’ लावण्यावरून वाद; महिलेसह तरुणाला बेदम मारहाण, काचा-खुर्च्यांची तोडफोड अन् जीवे मारण्याची धमकी; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जामखेड :जामखेड तालुक्यातील मोहा शिवारातील लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्रात मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘बैठक’ लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी एका महिलेवर कटरने प्राणघातक वार केले, तर पान टपरीचालक तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या गोंधळात कला केंद्रातील खुर्च्या आणि खोल्यांच्या काचांची तोडफोड करण्यात आली असून ५४ हजार रुपयांचे सोन्याचे लॉकेट हिसकावून नेल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलींदनगर येथील रहिवासी अभिषेक गुलचंद अंधारे (वय २४) हा मोहा शिवारातील लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्रात पान टपरी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. ११ सप्टेंबर रोजी रात्री १२:५० वाजण्याच्या सुमारास तो टपरीत असताना ऋषी गायकवाड, नदीम सय्यद, अमोल पिसाळ, विशाल मगर, गणेश चव्हाण, उमेर बारुद आणि हरी हे सर्वजण तेथे आले. त्यांनी अभिषेककडे बैठक लावण्याची मागणी केली. मात्र रात्री एक वाजता कला केंद्र बंद करण्याची वेळ असल्याने अभिषेकने बैठक लावण्यास स्पष्ट नकार दिला.

याच नकाराचा राग आल्याने गणेश चव्हाण, विशाल मगर आणि नदीम सय्यद यांनी अभिषेकला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या कला केंद्रातील महिलेलाही आरोपींनी मारहाण केली. मारहाणीदरम्यान नदीम सय्यद याने त्याच्या हातातील कटरने महिलेच्या दोन्ही हातांवर वार करून त्यांना गंभीर दुखापत केली, तर विशाल मगर याने महिलेच्या गळ्यातील अंदाजे ५४ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट बळजबरीने हिसकावून घेतले.

त्यानंतर सर्व आरोपींनी कला केंद्रातील खोल्यांच्या काचांची आणि खुर्च्यांची तोडफोड करून नुकसान केले. ‘पुन्हा आमच्या नादी लागलात तर जिवंत सोडणार नाही’ अशी जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

याप्रकरणी अभिषेक अंधारे याने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), ११९(१), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३२४(४), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश दत्तात्रय आघाव करत आहेत.

Leave a Comment