लोणी फाट्यावर हॉटेलच्या पाठीमागे रंगला होता तिरटचा डाव; रोख रकमेसह मोबाईल-पत्ते असा २९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
जामखेड : खर्डा-जामखेड रस्त्यावरील लोणी फाटा परिसरात हॉटेल ओम साईच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगाराच्या अड्ड्यावर खर्डा पोलिसांनी छापा टाकत सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रकमेसह तीन मोबाईल, जुगाराचे पत्ते असा एकूण २९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवारी (दि. २८) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
खर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलिस पथक पेट्रोलिंग करीत होते. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ. अरुण राजेंद्र गांगुर्डे यांना लोणी फाटा येथे हॉटेल ओम साईच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये बाबु केकाण हा इसम विनापरवाना पत्त्यांवर पैसे लावून तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहितीची खात्री करून पोलिसांनी पंचांना सोबत घेत संबंधित ठिकाणी छापा टाकला. रात्री सुमारे १०.४५ वाजता पोलिस पथक तेथे पोहोचले असता शेडमध्ये काही इसम गोलाकार बसून पत्ते खेळताना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली.
या 6 जुगाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल
१) बाबु अर्जुन केकाण (वय २८, रा. दरडवाडी)
२) राहुल राजेंद्र पवार (२७, रा. बांदखडक)
३) तानाजी खंडेराव पुंदे (४५, रा. बांदखडक)
४) अनिल वैजीनाथ दराडे (३०, रा. दरडवाडी)
५) गणेश लक्ष्मण गिते (२३, रा. गीतेवस्ती, आनंदवाडी)
६) भरत अंकुश गिते (३४, रा. आनंदवाडी)
अशी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी केलेल्या झडतीत बाबु केकाण याच्याकडे तीन पत्ते व २२०० रुपये रोख, राहुल पवार याच्याकडे तीन पत्ते व ९०० रुपये रोख मिळाले. तानाजी पुंदे याच्याकडे तीन पत्ते, ११०० रुपये रोख व १० हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, तर अनिल दराडे याच्याकडे तीन पत्ते, ९५० रुपये रोख व १० हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला.
गणेश गिते याच्याकडून तीन पत्ते, ७६० रुपये रोख व एक हजार रुपये किमतीचा आयटेल कंपनीचा कीपॅड मोबाईल, तर भरत गिते याच्याकडून तीन पत्ते व १२०० रुपये रोख मिळाली. याशिवाय जुगाराच्या डावातील १५०० रुपये रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली.
अशाप्रकारे रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी योगेश जबाजी कर्डिले यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ मधील कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रावसाहेब दशरथ नगरगोजे करीत आहेत.








