शटर उचकटून ५४ हजारांचा माल चोरी; काही तासांतच छडा, चोरीचा माल आणि कटावणी जप्त
जामखेड : शहरातील जय हिंद चौक येथील सचिन प्रोव्हीजन स्टोअर्सचे शटर उचकटून किराणा साहित्य चोरणाऱ्या दोघांना जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीचा ४ हजार ४७२ रुपये किमतीचा किराणा माल आणि शटर उचकटण्यासाठी वापरलेली लोखंडी कटावणी जप्त करण्यात आली. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ ते दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील सुमारे ५४ हजार १०० रुपये किमतीचे किराणा साहित्य चोरून नेले. सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला.
याबाबत जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जामखेड शहर तसेच परिसरात शोध घेऊन करण अशोक पवार (२०) आणि अनिल गौतम काळे (१९) यांना ताब्यात घेतले.
दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर करण पवार याच्या घरातून चोरी केलेला ४ हजार ४७२ रुपयांचा किराणा माल जप्त करण्यात आला. तसेच दुकानाचे शटर उचकटण्यासाठी वापरलेली लोखंडी कटावणीही पोलिसांनी हस्तगत केली.
या प्रकरणात किरण ऊर्फ खंड्या रावसाहेब काळे आणि रोहित अशोक काळे, दोघेही रा. मिलिंदनगर, भुतवडा रोड, जामखेड, हे आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
पोलिस पथकाची कारवाई
पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक अजित मोरे, सफौ शिवाजी कदम, पोहेकॉ संजय लोखंडे, पोलिस कॉन्स्टेबल ईश्वर माने, गणेश ढोबळे, दीपक बोराटे, कुलदीप घोळवे, ज्ञानेश्वर बेल्हेकर आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल रत्नमाला हराळे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोहेकॉ संजय लोखंडे करीत आहेत.








