जामखेड बाजार समितीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचे लोकार्पण
जामखेड : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ मुक्कामाची सुविधा देणे हा शेतकरी भवनाचा उद्देश नसून ते आधुनिक शेतीचे ज्ञान, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणारे केंद्र बनावे, अशी अपेक्षा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केली. बदलत्या काळात शेतीला मेहनतीबरोबरच ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची जोड देणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
जामखेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड परिसरात कृषी उत्पन्न बाजार समितीने उभारलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात तसेच शेतकऱ्यांसाठी आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, पणन संचालक शरद जरे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे, सहाय्यक निबंधक तथा बाजार समिती सचिव दिलीप तिजोरे, डॉ. भगवान मुरुमकर, रवि सुरवसे, अजय काशीद, बापूराव ढवळे, अमित चिंतामणी, संध्याताई सोनवणे यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. राम शिंदे यांनी शेतकरी भवनाच्या दर्जेदार उभारणीचे कौतुक करत हे भवन शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. बाजार समितीत माल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज निवासाची सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच येथे नियमितपणे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि कृषी विषयक उपक्रम राबविल्यास ते ज्ञानाचे केंद्र म्हणून विकसित होईल, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन सातत्याने कार्यरत असून हरभरा, उडीद, मका आणि कांदा या पिकांची नाफेड व संबंधित यंत्रणांमार्फत किमान आधारभूत किंमतीने (एमएसपी) खरेदी सुरू आहे. बाजारभाव घसरल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी शासन प्रभावी उपाययोजना राबवत असल्याचेही ते म्हणाले.
गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सर्वप्रथम शेतकरी सक्षम होणे आवश्यक आहे. बदलत्या हवामानाचा सामना करत उत्पादनवाढ साधायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, वैज्ञानिक शेती पद्धती आणि सातत्याने प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. नव्या पिढीतील शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहत नवकल्पनांचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा आणि ग्रामविकासाचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकरी भवन हे ग्रामीण विकास, कृषी मार्गदर्शन आणि नव्या संकल्पनांचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी आधुनिक शेती, कृषी विपणन, शासकीय योजना आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.









