जामखेड: शहरात भरदिवसा घडलेल्या एका थरारक चोरीने नागरिकांची झोप उडवली आहे. बँकेतून पैसे काढून बाहेर पडलेल्या एका वृद्ध महिलेवर पाळत ठेवत दोन महिलांनी अगदी फिल्मी स्टाईलने ४० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
घडले असे की, तपनेश्वर गल्लीतील विमल भगवान तवटे या दि. ६ एप्रिल रोजी भारतीय स्टेट बँक, जामखेड शाखेतून पेन्शनची ४० हजार रुपयांची रक्कम काढून बाहेर पडल्या. मात्र, त्यांना कल्पनाही नव्हती की बँकेबाहेर पडताच दोन अनोळखी महिला त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहेत.
तवटे या नेत्रदीप चष्माघरात चष्मा दुरुस्तीसाठी गेल्या. दुकानात सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक दोन महिला आत शिरल्या… “आँखों का चष्मा है क्या?” असा प्रश्न विचारत त्यांनी वातावरण अगदी सामान्य असल्याचा भास निर्माण केला. आणि याच दरम्यान, तवटे आजींनी पैशांची पिशवी काउंटरवर ठेवली… आणि पुढच्याच क्षणी खेळ झाला.
एका महिलेने बोलण्यात गुंतवून ठेवले, तर दुसरीने चपळाईने पिशवी उचलली… सगळं काही काही सेकंदांत घडलं. ना आवाज, ना धक्का—फक्त सफाईदार हातचलाखी.
घटना लक्षात येईपर्यंत त्या दोघी दुकानाबाहेर धावत सुटल्या होत्या. दुकानदाराने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण बाहेर आधीच तयार ठेवलेल्या पांढऱ्या स्विफ्ट कारमध्ये बसून आरोपी महिला क्षणार्धात गायब झाल्या.
दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू करताच सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक माहिती समोर आली—या महिलांनी बँकेपासूनच तवटे यांचा पाठलाग केला होता. म्हणजेच, ही चोरी पूर्णपणे पूर्वनियोजित ‘रेकी’ करूनच करण्यात आली होती. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांचे पथक संशयित महिलांचा शोध घेत आहे.










