३ वर्षांची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर; रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गासाठी प्रशासन मैदानात, पोलीस बंदोबस्तात हद्द निश्चितीला सुरुवात

Spread the love

जामखेड: जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी अखेर दिलासादायक घडामोड घडली आहे. तब्बल तीन वर्षांपासून अडथळ्यांत अडकलेले हे काम आता मार्गी लागण्याच्या दिशेने पुढे सरकले असून, आजपासून प्रत्यक्ष हद्द निश्चितीच्या कामाला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सुरुवात करण्यात आली आहे.

धुळीचे प्रचंड प्रमाण, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे जामखेडकरांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले होते. व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी आणि प्रवासी यांना याचा मोठा फटका बसत होता. अनेकदा किरकोळ अपघातांचीही नोंद होत असल्याने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत होती.

त्यामुळे बुधवारी सकाळपासून पोलीस बंदोबस्तात संयुक्त पथकाकडून प्रत्यक्ष जागेवर मोजणी (हद्द निश्चिती) सुरू करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नाला आता दिशा मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी २०२३ मध्येही हद्द निश्चिती करण्यात आली होती. मात्र अतिक्रमण धारकांनी ती मान्य न केल्याने आणि हद्दखुणा पुसल्याने वाद निर्माण झाला. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने महामार्गाचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते. परिणामी नागरिकांना वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागला. आता पुन्हा नव्याने सुरू झालेली प्रक्रिया हा त्या ठप्प स्थितीतून बाहेर पडण्याचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

तहसीलदार धनंजय बांगर यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, हद्द निश्चितीच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर किंवा खुणा पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच अतिक्रमण धारकांना लवकरच नोटिसा देऊन नियमानुसार अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली जाईल.

या कारवाईत नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी अजय साळवे, भूमी अभिलेख विभागाचे अनंत पाटील, प्रविण भोकणळ तसेच राष्ट्रीय महामार्ग शाखेचे अभियंता दशरथ कासार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. सर्व विभागांचा समन्वय साधत काम वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यामुळे जामखेडकरांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असली तरी “काम पूर्ण होईपर्यंत प्रशासनाचा वेग कायम राहावा” अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यास शहरातील वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच व्यापार, शिक्षण आणि दैनंदिन जीवनाला मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment

error: