ट्रकचालकाला लुटणाऱ्या टोळीचा अवघ्या १२ तासांत पर्दाफाश; ४ आरोपी गजाआड, जामखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Spread the love

जामखेड : जामखेड तालुक्यातील सावरगाव शिवारात मध्यरात्री ट्रक अडवून चालकाला मारहाण करत चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा जामखेड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पर्दाफाश करत चार आरोपींना गजाआड केले आहे. या वेगवान कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दि. ३१ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजता संतोष बिभीषण फरताडे (रा. सोमनाथ वाडी, ता. जि. बीड) हे सहकारी बाळू तांबेरा यांच्यासह ट्रक (क्र. MH१४ LX ९९६९) मधून पुण्याहून माजलगावकडे कोंबडी खाद्य घेऊन जात होते. जामखेड-साकत मार्गावर जामखेडपासून सुमारे ५ किमी अंतरावर स्पीड ब्रेकरमुळे ट्रकचा वेग कमी होताच एका स्कुटीस्वाराने ट्रकसमोर वाहन आडवे लावून ट्रक थांबवला.

ट्रक थांबताच मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी ट्रकवर हल्ला चढवला. ट्रकची काच फोडून चालक व सहकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील रोख रक्कम तसेच ट्रकमधील साहित्य जबरदस्तीने लुटून आरोपी काही क्षणातच फरार झाले.

या घटनेनंतर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १७५/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०९(६), ३२४(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.

तपासादरम्यान घटनास्थळी लपवून ठेवलेली एक मोटारसायकल पोलिसांच्या हाती लागली. याच धाग्यावरून तांत्रिक तपास करत आरोपींचा माग काढण्यात आला. खात्रीलायक माहितीच्या आधारे पोलिसांनी सावरगाव व सोनेगाव परिसरात सापळा रचत शुभम सूर्यभान चव्हाण, शुभम ज्ञानोबा चव्हाण, राम अशोक अडाले तसेच एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले.

पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई अचूक नियोजन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पार पाडली. वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली.

या कारवाईत पोलीस नाईक रविंद्र वाघ, देविदास पळसे, कुलदीप घोळवे, आकाश शेवाळे तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता. दक्षिण विभाग मोबाईल सेलनेही तांत्रिक मदत पुरवली.

Leave a Comment

error: