जामखेड: रविवारची सहल जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना जामखेड–कर्जत रोडवर घडली. अकलुज येथील वॉटरपार्कला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन चालकासह एकूण आठ जण जखमी झाले आहेत. यामध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड शहरातील नववी व दहावीचे विद्यार्थी रविवारी (दि. २९) सकाळी सुमारे ७ वाजता एमएच-१६ बीव्ही ०१०४ क्रमांकाच्या कारने अकलुजकडे निघाले होते. जामखेड शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जामखेड–कर्जत रोडवरील रत्नदीप मेडिकल कॉलेजजवळील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला.
क्षणातच कारने दोन ते तीन पलट्या मारत भीषण अपघात झाला. या दरम्यान गाडीने रस्त्याच्या कडेला असलेल्या लाईटच्या खांबाला जोरदार धडक दिली. धडकेनंतरही वाहन थांबले नाही, तर बाजूच्या तारेच्या कंपाउंडला तोडत आतमध्ये घुसले. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील नागरिक घाबरून बाहेर आले.
स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना गाडीतून बाहेर काढले. नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. वेळेत मदत मिळाल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.
या अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :श्रेयश प्रल्हाद राजगुरू, चौत्यन्य भक्तराज राजगुरू, ओम महेंद्र राऊत, सौरभ बबन यवले, साहिल अंबिका जाधव, यश संतोष खेत्रे, अमिन शेख (सर्व रा. जामखेड) व चालक.
यामध्ये श्रेयश प्रल्हाद राजगुरू व वाहन चालक हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
आनंदाच्या सहलीवर काळाचा घाला!
रविवारचा आनंददायी दिवस आणि सहलीचा उत्साह घेऊन निघालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास काही क्षणांतच भीषण ठरला. हसत-खेळत सुरू झालेली ही सफर अचानक अपघातात बदलल्याने सर्वत्र धक्का बसला आहे.या घटनेमुळे पालकवर्गात चिंता व्यक्त होत असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या अपघाताने सुरक्षित प्रवासाच्या महत्त्वाची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.










