जामखेड: जामखेड-खर्डा मार्गावर हॉटेल बळीराजा समोर आज (दि. 28 मार्च) सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 26 वर्षीय साहिल सलीम बागवान याचा मृत्यू झाला असून त्याचा चुलत भाऊ मोहसीन हनीफ बागवान गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने जामखेड व खर्डा परिसरात खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, साहिल आणि मोहसीन हे दोघे स्प्लेंडर दुचाकीवरून (MH-16-CU-8287) खर्डाहून जामखेडकडे बाजारासाठी निघाले होते. ते हॉटेल बळीराजा समोर आले असता जामखेडकडून खर्ड्याकडे येणाऱ्या बोलेरो जीपने (MH-16-DM-6058) अचानक हॉटेलकडे वळण घेतले. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली.
या धडकेत दोघेही तरुण रस्त्यावर फेकले गेले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर मुस्तकीन याला ॲडमिट केले, तर साहिल यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी साहिल यांना मृत घोषित केले. मोहसीन याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच खर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त बोलेरो वाहन ताब्यात घेण्यात आले असून चालक गोकुळ दराडे याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, हा संपूर्ण अपघात जवळील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून त्या फुटेजच्या आधारे अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. बोलेरोचा वेग आणि अचानक घेतलेले वळण हे अपघाताचे प्रमुख कारण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मृत साहिल बागवान हा कुटुंबातील कर्ता तरुण होता. तो व मोहसीन बागवान हे दोघेही बटाट्याच्या होलसेल व रिटेल व्यवसायात कार्यरत होते. त्यांच्या या अकाली घटनेमुळे खर्डा व परिसरात शोककळा पसरली आहे.










