जामखेड: संपूर्ण कुटुंब झोपेत… आणि काही मिनिटांत घर साफ!

Spread the love

वाघा येथे मध्यरात्रीची सिनेस्टाईल घरफोडी; किचन फोडून ३.९६ लाखांचे दागिने गायब, सकाळी उघड झाला धक्कादायक प्रकार

जामखेड : जामखेड तालुक्यातील वाघा येथे २५ मार्चच्या मध्यरात्री घडलेल्या धाडसी आणि नियोजित घरफोडीने परिसर हादरला आहे. अज्ञात चोरट्यांनी घरातील सदस्यांना झोपेत असतानाच हॉलमध्ये कोंडून ठेवत किचनचा दरवाजा फोडून तब्बल ३ लाख ९६ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेने “घरात असतानाही सुरक्षित नाही” अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

चोरट्यांची ‘परफेक्ट प्लॅनिंग’; आधी कोंडले, मग फोडले कपाट!

वाघा येथील आकाश रामदास बारस्कर (वय २६) हे आपल्या आई-वडिलांसह हॉलमध्ये झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात शिरकाव केला. कुणालाही जाग येऊ नये म्हणून त्यांनी प्रथम हॉलच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावली. त्यामुळे घरातील तिघेही आत अडकून पडले आणि चोरट्यांना मोकळे मैदान मिळाले. यानंतर त्यांनी थेट किचनचा दरवाजा लक्ष्य केला. कडीकोंडा तोडून आत प्रवेश करत कपाटावर हल्ला चढवला आणि काही मिनिटांतच सर्व मौल्यवान ऐवज गोळा केला.

लाखोंचा ऐवज क्षणात गायब!

चोरट्यांनी सोन्याचे मणीगंठन, अंगठी, चैन, कर्णफुले, नथ, बोरमाळ, गंठण, बदाम पेटी, कानातील वेल, झुबे तसेच चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरी इतक्या वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने झाली की घरातील कुणालाही काहीच सुगावा लागला नाही.

पहाटे उघड झाला थरारक प्रकार

पहाटे फिर्यादीचे वडील उठले असता दरवाज्याला बाहेरून कडी लावलेली दिसली. कडी काढून किचनमध्ये गेल्यावर कपाट फोडलेले आणि दागिने गायब असल्याचे दिसताच एकच खळबळ उडाली.

पोलिसांची धावपळ; फॉरेन्सिक पथक घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आकाश बारस्कर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास करत पुरावे गोळा केले. कर्जत-जामखेड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे आणि पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची दिशा निश्चित केली.सध्या पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.

Leave a Comment

error: