जामखेड : कर्जत तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण घुले यांनी सोमवारी (दि. २३) भाजपला सोडचिठ्ठी देत शिंदेसेनेत प्रवेश केला. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कर्जतच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नगरपंचायतीतील सत्तासमीकरण बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवीण घुले यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. धनुष्यबाण हाती घेत त्यांनी नव्या राजकीय वाटचालीची घोषणा केली.
घुले यांच्या या निर्णयामुळे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे. कर्जत तालुक्यात भाजपची ताकद वाढवण्यात घुले यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांचे अचानक झालेले पक्षांतर हे भाजपसाठी धोक्याची घंटा मानले जात आहे.
कर्जत नगरपंचायतीतील सत्तांतरातही घुले यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. आमदार रोहित पवार यांच्या गटाच्या ताब्यात असलेल्या नगरपंचायतीत बदल घडवून आणताना त्यांनी प्रभावी रणनीती राबवली होती. त्यामुळे त्यांच्या नव्या राजकीय पावलाचा थेट परिणाम स्थानिक सत्तेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घुले यांचा राजकीय प्रवासही लक्षवेधी राहिला आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी ११ मार्च २०२३ रोजी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अवघ्या काही काळातच त्यांनी भाजपला रामराम ठोकत पुन्हा राजकीय समीकरणे बदलली आहेत.

सोमवारी सकाळपासूनच त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर ‘जय महाराष्ट्र’ असे स्टेटस ठेवत बदलाचे संकेत दिले होते. या चर्चांना उधाण आले असतानाच रात्री साडेआठच्या सुमारास घुले मुंबईत दाखल झाले आणि अधिकृतपणे शिंदेसेनेत प्रवेश केला.
नगरपंचायतीत मोठी उलथापालथ?
घुले यांच्या प्रवेशानंतर कर्जत नगरपंचायतीतील सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले यांचे पती सचिन घुले यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता नगराध्यक्षा रोहिणी घुले या भाजपमध्ये कायम राहणार की त्या देखील शिंदे गटात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या
घुले यांच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला कर्जतमध्ये बळ मिळणार का, तसेच भाजपची पकड सैल होणार का, याबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात नगरपंचायतीतील पदाधिकारी बदल, अविश्वास ठराव किंवा नव्या आघाड्यांची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत, प्रवीण घुले यांच्या पक्षांतराने कर्जतच्या राजकारणात नवे वारे वाहू लागले असून, पुढील काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.










