जामखेड : दिघोळ येथे हनुमान जयंतीनिमित्त होणाऱ्या यात्रेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ, अनुशासनभंग किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्ताची तयारी केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही गय न ठेवता थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपनिरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी दिला.
यात्रा शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक उज्वलसिंह राजपूत होते. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामदैवत श्री बजरंग बली यांच्या हनुमान जयंतीनिमित्त ३ व ४ एप्रिल २०२६ रोजी भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ एप्रिल रोजी रात्री पारंपरिक छबिना मिरवणूक काढण्यात येणार असून ती रात्रभर गावातून फिरवून पहाटे मंदिरात नेण्यात येईल. त्यानंतर ४ एप्रिल रोजी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
यात्रेदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी संबंधितांनी अनिवार्यपणे परवानगी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार ध्वनीप्रक्षेपक वापरण्याची वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली असून रात्री १० नंतर सर्व वाद्य व ध्वनीप्रक्षेपक बंद ठेवणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
छबिना मिरवणुकीदरम्यान केवळ पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले असून अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांना सक्त मनाई करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
तसेच ग्रामपंचायतीने यात्रास्थळी आवश्यक सूचना फलक लावणे, स्वच्छता राखणे आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी, असेही सांगण्यात आले. महिलांशी छेडछाड किंवा कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी सर्वांनी सतर्क राहावे आणि अशा घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले.
शेवटी, पोलीस प्रशासनाने सर्व ग्रामस्थांना यात्रेच्या शुभेच्छा देत शांतता, एकोप्याने आणि पारंपरिक पद्धतीने यात्रा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.










