मतदार यादी अचूक व पारदर्शक करण्यासाठी तहसीलदार तथा तालुका निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन; दुबार नोंदी व बाहेरील व्यक्तींवर नियंत्रणाचा आग्रह
जामखेड: तालुक्यातील साकत गावात आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असताना, ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि नियमांनुसार पार पाडावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता बिभिषण अरुण वराट यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदार तथा तालुका निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, मतदार नोंदणी ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून ती लोकशाहीच्या पायाभूत घटकांपैकी एक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया भौगोलिक वास्तवावर आधारित आणि निष्पक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी गावातील प्रत्येक घराची प्रत्यक्ष पाहणी करून (डोअर-टू-डोअर सर्व्हे) मतदारांची अचूक नोंदणी करण्यात यावी. नागरिक ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्याच ठिकाणी त्यांची नोंद व्हावी, तसेच प्रत्येक घराला अधिकृत क्रमांक देऊन व्यवस्थित आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, मतदार यादीत दुबार नोंदी होणे, बाहेरील किंवा तात्पुरत्या वास्तव्यास असलेल्या व्यक्तींचा समावेश होणे यामुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अशा त्रुटी टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारचा दबाव, राजकीय हस्तक्षेप किंवा शिफारशींचा प्रभाव पडू नये, यासाठी अधिकाऱ्यांनी स्वतंत्र आणि जबाबदारीने काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुका पारदर्शक व विश्वासार्ह वातावरणात पार पडण्यासाठी मतदार यादी ही अचूक असणे अत्यावश्यक असल्याने, ही संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही दबावाशिवाय पार पाडावी. अन्यथा नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
दरम्यान, साकत गावात या निवेदनानंतर मतदार यादीच्या पारदर्शकतेबाबत चर्चा रंगू लागली असून, प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीत कोणताही वाद निर्माण होऊ नये, यासाठी ही प्रक्रिया निष्पक्ष होणे गरजेचे असल्याचे मतही स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.










