अशोक खरात प्रकरण भोवलं; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकरांचा राजीनामा

Spread the love

जामखेड: राज्यात खळबळ उडवणाऱ्या अशोक खरात बलात्कार प्रकरणामुळे मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. या प्रकरणात अटक झालेल्या अशोक खरातसोबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या मोठ्या अडचणीत सापडल्या. संबंधित व्हिडीओंमुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताच विरोधकांनी राजीनाम्याची जोरदार मागणी केली.

दरम्यान, प्रकरण दिवसेंदिवस चिघळत गेले. नव्या फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून वाद अधिक तीव्र झाला. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही या प्रकरणावर नाराजी व्यक्त करण्यात आली. पक्षातील नेत्या रुपाली ठोंबरे यांनी उघडपणे टीका करत चाकणकरांवर निशाणा साधला. त्यामुळे चाकणकर यांच्यावरचा राजकीय दबाव आणखी वाढला.

या घडामोडींमध्ये चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत तातडीने राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली.

यानंतर चाकणकर देवगिरी बंगल्यावर दाखल होऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. सुमारे २० ते २५ मिनिटे चाललेल्या चर्चेत त्यांनी आपली बाजू मांडली. या भेटीनंतर त्यांनी आपला राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला असून, तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्देशून लिहिण्यात आला आहे.

अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून, या घटनेमुळे महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणातील पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राज्याच्या राजकारणात या घडामोडींचे पडसाद आणखी उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Comment

error: