जमाखेड: अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच गावपातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींमधील तब्बल ९० रिक्त जागांसाठी २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून या निवडणुकीत ८५ सदस्यपदे आणि ५ थेट सरपंचपदांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हाभरात निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अकोले तालुक्यातील पाडुशी, राहुरी तालुक्यातील केंदळ खुर्द, नेवासा तालुक्यातील खुपटी, शेवगाव तालुक्यातील कुरुडगाव आणि जामखेड तालुक्यातील रत्नापूर या पाच ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदासाठी मतदान होणार आहे. सरपंचपदाच्या थेट निवडणुकीमुळे या गावांमध्ये विशेष राजकीय चुरस निर्माण होण्याची शक्यता असून इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
या सर्व जागा निधन, राजीनामा, बडतर्फी तसेच विविध प्रशासकीय कारणांमुळे रिक्त झाल्या आहेत. परिणामी, या पोटनिवडणुकांकडे राजकीय पक्ष, स्थानिक गट आणि कार्यकर्त्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. अनेक ठिकाणी नव्या नेतृत्वाला संधी मिळणार असल्याने या निवडणुका निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे. पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन सुरू आहे.
निवडणूक कार्यक्रम असा राहणार…
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३० मार्च २०२६ रोजी निवडणूक नोटीस प्रसिद्ध होईल. ७ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल, तर १७ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून २९ एप्रिल रोजी मतमोजणी पार पडून निकाल जाहीर केले जाणार आहेत.
तालुकानिहाय चित्र ठरवणार निकाल
अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत सदस्यपदांच्या एकूण ८५ जागांसाठी निवडणूक होणार असून, यामध्ये अकोले तालुका सर्वाधिक प्रभावी ठरणार आहे. अकोले येथे तब्बल ५५ जागा रिक्त असल्याने या तालुक्याकडे जिल्ह्याचे विशेष लक्ष लागले आहे. तर कोपरगाव, राहुरी आणि शेवगाव तालुक्यांमध्ये प्रत्येकी ५ जागा असल्याने या ठिकाणीही चुरशीच्या लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. इतर तालुक्यांमध्ये तुलनेने कमी जागा असल्या तरी स्थानिक स्तरावर चुरस रंगण्याची शक्यता आहे.
पोटनिवडणूक होणारी सदस्य संख्या
अकोले – ५५ (सर्वाधिक) संगमनेर – ४ कोपरगाव – ५ श्रीरामपूर – १ राहाता – १ राहुरी – ५ नेवासा – ३ नगर – ३ पाथर्डी – १ शेवगाव – ५ कर्जत – १ श्रीगोंदा – १










