रस्ता सुरक्षा स्पर्धांमध्ये काव्या जगतापची चित्रकलेत बाजी; निबंधात अनन्य कामे अव्वल, विद्यार्थ्यांकडून सुरक्षित वाहतुकीचा प्रभावी संदेश

Spread the love

जामखेड: रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित चित्रकला, निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांमध्ये काव्या आनंद जगताप हिने चित्रकलेत प्रथम क्रमांक पटकावला, तर निबंध स्पर्धेत अनन्य विवेक कामे अव्वल ठरला असून विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत रस्ता सुरक्षेचे महत्त्व आपल्या कलाकृती व लेखनातून प्रभावीपणे मांडले.

चित्रकला स्पर्धेत काव्या आनंद जगताप (कन्या विद्यालय, जामखेड) हिने प्रथम क्रमांक पटकावला. आरोही जितेंद्र सरोदे हिला द्वितीय, तर ईशा अखिल तांबोळी हिला तृतीय क्रमांक मिळाला. निबंध स्पर्धेत अनन्य विवेक कामे (ल. ना. होशिंग विद्यालय) प्रथम, संचिता नितीन ढेरे (कन्या विद्यालय) द्वितीय आणि तन्वी विजय गवळी (ल. ना. होशिंग विद्यालय) तृतीय ठरल्या.

कन्या विद्यालय, जामखेड येथे आयोजित गौरव समारंभात काव्या जगताप हिला प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आले. यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक चेतन दासनूर, निलेश शिंदे, सोमिनाथ शिंदे, नागेश विद्यालयाचे प्राचार्य बी. के. मडके, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भोर आर. आर., पत्रकार सुदाम वराट, आबा जायगुडे, लटपटे डी. व्ही. तसेच काव्याच्या आई प्राजक्ता जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धांमध्ये हेल्मेटचा वापर, सीटबेल्टचे महत्त्व, ट्रॅफिक सिग्नलचे नियम, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे, सुरक्षित अंतर राखणे अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी संदेश दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होत असून भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

Leave a Comment

error: