जामखेडमध्ये पुरवठा विभागाची धडाकेबाज कारवाई! १५ हॉटेल-धाब्यांवर छापे; १९ घरगुती गॅस सिलिंडर जप्त

Spread the love

जामखेड : तालुक्यातील वाढत्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अखेर कठोर पाऊल उचलत हॉटेल व धाब्यांवर धडक कारवाई केली. पुरवठा विभागाच्या छापेमारीत घरगुती गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात अनधिकृत वापर उघडकीस आला असून एकूण १९ घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई जामखेडचे तहसीलदार धनंजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. १६ मार्च रोजी विशेष मोहीम राबवण्यात आली असून यासाठी तीन स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली होती. या पथकांनी जामखेड शहरासह तालुक्यातील विविध भागांतील १५ हॉटेल्स व धाब्यांची सखोल तपासणी केली.

तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलिंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरले जात असल्याचे आढळून आले. हे नियमबाह्य असून, अशा प्रकारामुळे सामान्य ग्राहकांना गॅसची कृत्रिम टंचाई भासते. त्यामुळे संबंधित ठिकाणांहून १९ सिलिंडर तात्काळ जप्त करण्यात आले.

प्रशासनाच्या या धाडसी कारवाईमुळे घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्या हॉटेल व धाबा चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. अनधिकृत साठा केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कृत्रिम गॅस टंचाईचा सामना करावा लागतो, त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

पुरवठा निरीक्षक जालिंदर कदम म्हणाले की, घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणे नियमबाह्य असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गॅस टंचाईला सामोरे जावे लागते.“जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पुढेही अशा प्रकारच्या धडक छापेमाऱ्या सुरूच राहणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच, नागरिकांनी आपल्या परिसरात गॅसचा गैरवापर, अनधिकृत साठा किंवा काळाबाजार होत असल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Comment

error: