जामखेड: जामखेड तालुक्यातील जवळा परिसरातील वाढत्या वीज समस्येच्या पार्श्वभूमीवर जवळा येथील वीज उपकेंद्रासाठी ५ एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या मागणीला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष अजिनाथ हजारे यांनी शेतकऱ्यांसह केलेल्या मागणीची विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या मागणीची दखल घेत जवळा सबस्टेशनचे रखडलेले काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जवळा येथे ३३/११ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र कार्यरत असून येथे सध्या १ एमव्हीए क्षमतेचे दोन ट्रान्सफॉर्मर आहेत. मात्र परिसरातील वाढती लोकसंख्या, बागायती क्षेत्राचा विस्तार आणि शेतीपंपांची वाढती संख्या यामुळे वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हे उपकेंद्र सध्या क्षमतेपेक्षा अधिक भाराखाली कार्यरत असल्याने शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आवश्यक दाबाची वीज मिळत नाही.
कमी व्होल्टेजमुळे बोअरवेलच्या मोटारी जळणे, वारंवार फ्युज उडणे तसेच अचानक वीजपुरवठा खंडित होणे अशा समस्या वाढल्या असून याचा फटका शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. जवळा वीज उपकेंद्रांतर्गत तब्बल सात फीडर कार्यरत असल्याने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठ्याचा भार एकाच उपकेंद्रावर पडत आहे. त्यामुळे विद्यमान ट्रान्सफॉर्मर अपुरे पडत असल्याने येथे ५ एमव्हीए क्षमतेचा नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात अजिनाथ हजारे यांनी शेतकऱ्यांसह चोंडी येथे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले होते. निवेदनात नमूद करण्यात आले की, दोन महिन्यांपूर्वी जवळा सबस्टेशन येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र हे काम अचानक बंद पडले असून मंजूर असलेले काम का थांबविण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
यावर सभापती प्रा. राम शिंदे यांनी तातडीने महावितरणच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जवळा येथील सबस्टेशनमधील काम का थांबले आहे, याबाबत चौकशी केली. तसेच ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे जवळा परिसरातील शेतकरी व नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी माजी उपसरपंच गौतम कोल्हे, ज्योती क्रांतीचे संचालक मारुती रोडे, ग्रामपंचायत सदस्य किसन सरोदे, सोसायटीचे संचालक राजेंद्र हजारे, सतीश हजारे, संकेत हजारे आदी शेतकरी उपस्थित होते.










