जवळा येथील श्री जवळेश्वर देवस्थानाला ‘ब’ वर्ग ग्रामीण यात्रास्थळाचा दर्जा

Spread the love

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेत समावेश; विकासकामांना मिळणार गती

जामखेड : जामखेड तालुक्यातील जवळा येथील प्रसिद्ध श्री जवळेश्वर देवस्थानाला राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना अंतर्गत ‘ब’ वर्ग ग्रामीण यात्रास्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने दि. ५ मार्च २०२६ रोजी यास अधिकृत मान्यता दिल्याने या देवस्थान परिसरातील विकासकामांना आता गती मिळणार आहे.

संदर्भातील प्रस्ताव राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. मा. प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखालील राज्य निकष समितीच्या दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाची सविस्तर छाननी करण्यात आली. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार प्रस्ताव परिपूर्ण असल्याचे समितीच्या निदर्शनास आल्याने सदर यात्रास्थळाला ‘ब’ वर्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या दर्जामुळे आता देवस्थान परिसरात विविध विकासकामे राबविण्यासाठी शासनाच्या निधीतून मदत उपलब्ध होणार आहे. भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, प्रकाशयोजना, वाहनतळ, विश्रांती व्यवस्था, परिसराचे सुशोभीकरण तसेच यात्रेकरूंना आवश्यक इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची कामे या योजनेतून हाती घेता येणार आहेत.

श्री जवळेश्वर देवस्थान हे जामखेड तालुक्यातील श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते. वर्षभर तसेच यात्रेच्या काळात राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे येथे मूलभूत सोयीसुविधांचा विकास व्हावा, देवस्थान परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व भाविकांकडून दीर्घकाळापासून करण्यात येत होती.

या मागणीसाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर श्री जवळेश्वर देवस्थानाचा या योजनेत समावेश होऊन ‘ब’ वर्ग ग्रामीण यात्रास्थळाचा दर्जा मिळाल्याने जवळा परिसरातील ग्रामस्थ, भाविकांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

“श्री जवळेश्वर मंदिर देवस्थान हे सन २०१४ पासून ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रात समाविष्ट होते. या देवस्थानाला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळावा यासाठी जवळा ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे अखेर श्री जवळेश्वर देवस्थानाला ‘ब’ वर्ग ग्रामीण यात्रास्थळाचा दर्जा मिळाला आहे. ही जवळा गावासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या निर्णयामुळे देवस्थान परिसरात विविध विकासकामे करण्याची संधी उपलब्ध होणार असून भाविकांसाठी अधिक चांगल्या सोयीसुविधा निर्माण होतील,”

  • सुशील आव्हाड – सरपंच ग्रामपंचायत, जवळा

“श्री जवळेश्वर देवस्थानाला ‘ब’ वर्ग ग्रामीण यात्रास्थळाचा दर्जा मिळणे ही जवळा गावासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या निर्णयामुळे देवस्थान परिसराच्या विकासाला नवी चालना मिळणार असून भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामस्थांच्या दीर्घकाळापासून असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा दर्जा मिळाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करते,”

  • सौ. शीतल प्रशांत शिंदे – उपसरपंच ग्रामपंचायत, जवळा

Leave a Comment

error: