निवडणुका लांबल्याने सरपंचांच्या जागी विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक; गावातील विकासकामे आता प्रशासकांच्या ताब्यात
जामखेड|जामखेड तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ ८ व ९ फेब्रुवारी रोजी संपत असून, मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतींवर ८ फेब्रुवारीपासून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत समिती स्तरावरून गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी ६ फेब्रुवारी रोजी याबाबत अधिकृत आदेश जारी केले आहेत.
सध्या नियुक्त झालेल्या प्रशासकांमध्ये कृषी विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, शाखा अभियंता आणि केंद्रप्रमुख यांचा समावेश आहे. मात्र, अधिकारी संख्या मर्यादित असल्यामुळे एका प्रशासकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
प्रशासकांना सरपंचांच्या अधिकारांची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली असून, गावातील सर्व विकासकामे, योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासनिक निर्णय आता त्यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहेत. मात्र, गावातील स्थानिक समस्या व अडचणींविषयी प्रशासकांना पुरेशी माहिती नसल्यामुळे कामकाजात अडचणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या. मध्यंतरी सरपंच पदाची आरक्षण निश्चित झाले आहे. निवडणुकीबाबत प्रशासनाकडून सध्या तरी कोणतेही आदेश निघालेले नाहीत.सध्या सरपंच जे कार्य करीत आहेत, ती सर्व कामे करण्याचा अधिकार या प्रशासकांना मिळणार आहे.
प्रशासक नेमणूक झालेली गावे
ज्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक झाली आहे, त्यात आघी, आनंदवाडी, आपटी, अरणगांव, बांधखडक, बाळगव्हाण, बावी, बोर्ले, चोंडी, चोभेवाडी, डोणगांव, दिघोळ, देवदैठण, धानोरा, धामणगांव, धोंडपारगांव, गुरेवाडी, घोडेगांव, जवळके, जातेगांव, जायभायवाडी, कवडगांव, कुसडगांव, खर्डा, खांडवी, खुरदैठण, लोणी, मोहरी, मोहा, नान्नज, नायगांव, नाहुली, पाटोदा, पाडळी, पिंपरखेड, पिंपळगांव आळवा, पिंपळगांव उंडा, पोतेवाडी, राजेवाडी, सारोळा, सातेफळ, सावरगांव, सोनेगांव, तरडगांव, तेलंगशी, वाघा आणि झिक्री या गावांचा समावेश आहे.