मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा; लाभार्थी महिलांच्या शंका व तक्रारींच्या निरसनासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर

Spread the love

मुंबई | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या शंका व तक्रारींच्या निरसनासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. योजनेशी संबंधित सर्व प्रकारच्या तक्रारी, विशेषतः e-KYC प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका दूर करण्यासाठी 181 हा महिला हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थी महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने त्यांचा योजनेचा लाभ स्थगित झाल्याच्या तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, अशा तक्रारींसह योजनेशी संबंधित इतर प्रश्नांचे फोनद्वारे निरसन करण्यासाठी 181 या हेल्पलाईनवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेसाठी कॉल ऑपरेटर्सना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन याच हेल्पलाईनद्वारे करण्यात येणार असल्याचं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत e-KYC पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव e-KYC करताना झालेल्या चुका लक्षात आल्याने, संबंधित लाभार्थी महिलांची योजनेच्या निकषांनुसार अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या कालावधीतील प्रत्येकी 1500 रुपयांचा हप्ता अद्याप मिळालेला नसल्याने विदर्भातील भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये लाभार्थी महिलांनी आंदोलन केल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.

सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याचा लाभ डिसेंबरच्या अखेरीस आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला, तर डिसेंबर महिन्याचा लाभ 14 जानेवारीच्या सुमारास लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

आवश्यकता भासल्यास लाडक्या बहिणींनी 181 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे.

Leave a Comment

error: