खडकी रोडवरील जळालेला ट्रान्सफॉर्मर अवघ्या १२ तासांत बदलला; युवा नेते नितीन कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश

Spread the love

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या निर्देशानंतर महावितरणची युद्धपातळीवरील कारवाई

जामखेड : खडकी मार्गावरील वीज वितरण केंद्र (ट्रान्सफॉर्मर) अचानक जळाल्याने खडकी रोड परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. यामुळे शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्याची व्यवस्था ठप्प झाली होती. मात्र शिवसेनेचे तालुका उपप्रमुख तथा जवळा ग्रामपंचायत सदस्य नितीन कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे अवघ्या १२ तासांत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच नितीन कोल्हे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील शेतकऱ्यांची अडचण जाणून घेत त्यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत परिस्थितीची गंभीरता मांडली. रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा यांसारख्या पिकांना पाण्याची अत्यंत गरज असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकरी चिंतेत होते. पिके वाळण्याची भीती निर्माण झाली होती.

नितीन कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाशीही तात्काळ संपर्क साधला. या प्रकरणाची दखल घेत सहसचिव एकनाथ शेलार यांनी महावितरणला तातडीचे निर्देश दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी आवश्यक यंत्रसामग्री व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पाठवून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. अवघ्या १२ तासांच्या आत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

वीजपुरवठा सुरू होताच शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. “वेळेत वीज मिळाल्यामुळे आमची पिके वाचली. अन्यथा मोठे आर्थिक नुकसान झाले असते,” अशी भावना शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. कृतज्ञतेपोटी शेतकऱ्यांनी नितीन कोल्हे यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला.

यावेळी भारत मोटे, संदीप शिंदे, बंडू वाळुंजकर, राजेंद्र महाजन, बाळासाहेब वाळुंजकर, सतीश आव्हाड, दाजीभाऊ भोगे, अनिल वाळुंजकर, बंडू फरांदे, सोमा वाळके, नागेश वाळके, आनंद जैन आदी शेतकरी उपस्थित होते.

या जलद आणि प्रभावी कार्यवाहीमुळे प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक होत असून खडकी रोड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांबाबत जागरूक नेतृत्व आणि प्रशासन यांची समन्वय साधल्यास प्रश्न किती वेगाने मार्गी लागू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

Leave a Comment

error: