जामखेड: पंचवीस वर्षांपासून रखडलेला कर्जत एसटी डेपो अखेर सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच, ‘कर्जत’ नाव पुसल्याच्या प्रकाराने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी (११ सप्टेंबर) कर्जतला दाखल झालेल्या नवीन एसटी बसगाड्यांवर आगाराचे नाव पाहून कर्जतकरांचा आनंद ओसंडून वाहत होता. मात्र, रविवारी एका बसवरील पुढील व मागील चौकटीत कोरलेले ‘कर्जत’ नाव पुसल्याचे दिसताच संतापाची लाट उसळली.
त्यानुसार, गुरुवारी जामखेड आगारातून ‘कर्जत आगार’ नावाच्या तीन बसगाड्या दाखल झाल्या. स्थानिकांनी फटाके फोडून आणि जयघोष करून स्वागत केले. “आता बस आगार सुरू होणार” अशा चर्चांना उधाण आले.
ज्या बसगाड्यांचे स्वागत नागरिकांनी जल्लोषात केले, त्यापैकीच एका बसवरील ‘कर्जत’ हे नाव रविवारी पुसलेले दिसून आले. या घटनेनंतर “हा कोणाचा खोडसाळपणा आहे?”, “स्थानिक राजकारणातील पोटदुखीचे प्रतिबिंब आहे का?”, “पुन्हा एकदा राजकीय डावपेचात डेपोचा प्रश्न रखडणार का?” असे सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.
या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला. ते म्हणाले –“पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या कर्जत एसटी डेपोचा प्रश्न माझ्या हातून सुटला याचं समाधान आहे. नुकतंच सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणानंतर १० सप्टेंबरपर्यंत डेपोला बस देण्याचं आणि २० सप्टेंबरपर्यंत डेपो सुरू करण्याचं आश्वासन प्रशासनाने दिलं होतं. त्यानुसार एसटी बसही दाखल झाल्या. पण या बसवरील ‘कर्जत’ नाव खोडण्याचा खोडसाळपणा कुणीतरी केला. हा प्रकार स्थानिक नेत्यांच्या राजकीय पोटदुखीतून झाला नाही ना? अशी शंका येते. कर्जत तालुक्याच्या स्वाभिमानाचं आणि संतश्री गोदड महाराजांच्या पवित्र भूमीचं नाव पुसण्याच्या या विकृतीला कर्जतकर डोक्यात ठेवतील…”
या प्रकरणी स्थानिक एसटी अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, नागरिकांमध्ये दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.